दुध उत्पादकांच्या प्रश्नासाठी आंदोलन सुरूच ठेवणार खासदार राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला इशारा
मुंबई - जोपर्यंत सरकार दूध उत्पादकांच्या खात्यात थेट पाच रुपये जमा करणार नाही किंवा दूध उत्पादकांना आता मिळणार्या दरामध्ये लिटरमागे पाच रुपयांची वाढ होणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा बुधवारी वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला. 16 जुलै पासून मुंबईत दूध येऊ देणार नाही. दुधाचा एकही थेंब विकणार नाही. तसेच सरकारने दूध भुकटी निर्यात करणार्यांना किलोला 50 रुपये अनुदान जाहीर केले आहे. मात्र, हे तुटपुंजे आहे. या अनुदानाचा फक्त बोटांवर मोजण्याएवढ्या लोकांनाच फायदा होणार आहे. हे सरळ सरळ सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचे काम आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली आहे. काही लोकांनाच ’मलई’ मिळवून देणारा आणि सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसणारा सरकारचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. दूध उत्पादकाच्या खात्यावर अनुदानाची रक्कम थेट मिळाल्याशिवाय दूध आंदोलन मागे घेणार नाही, असे शेट्टी यांनी शासनाला ठणकावून सांगितले आहे. सद्यस्थितीत दूध उत्पादकांचे हाल सुरू झाले आहेत. दूध उत्पादन करणार्यांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान पाहिजे. शेतकरी भीक मागत नाही. राज्य सरकारने जाहीर के लेले पॅकेज हे फसवे आहे. राज्य सरकारच्या पॅकेजला आम्ही भीक घालत नाही. आमचे दूध विक्री बंद आंदोलन आणि मुंबई दूध येऊ न देण्याचा निर्णय ठाम असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
Post Comment