नियमित कर्ज भरणार्‍यांना कमीत कमी 15 हजार रुपये अनुदान!

मुंबई, दि. 02 - नियमित कर्ज भरणार्‍यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. नेहमी कर्ज भरतात त्यांना कमीत कमी 25 हजार किंवा रक्कमेच्या 25% कर्जमाफीची  मदत मिळणार होती. पण आता त्यांना कमीत कमी 15 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाला याबाबत माहिती दिली.  सरकारने नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना एकूण कर्जाच्या 25 टक्के रक्कम अनुदान (जास्तीत जास्त मर्यादा 25 हजार रुपये) देण्याचा निर्णय घेतला होता. पण  ज्यांचं कर्ज कमी आहे, त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे टक्केवारीच्या अटीऐवजी आता नियमित कर्ज भरणार्‍यांना 15 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.  कर्जमाफीसाठी तरतूद करण्यात आलेल्या रक्कमेत या निर्णयामुळे वाढ होणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.
दीड लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्यात आल्यानंतर नियमित कर्ज भरणार्‍यांना मदत म्हणून 25 टक्के अनुदान (जास्तीत जास्त मर्यादा 25 हजार रुपये)  सरकारकडून मिळणार होतं. मात्र ज्यांचं कर्ज कमी आहे, त्या शेतकर्‍यांना या निर्णयाचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे सरकारने या निर्णयात बदल करुन कमी कर्ज  असणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ एखाद्या शेतकर्‍याचं 20 हजार रुपये कर्ज आहे. तर त्याला 25 टक्के अनुदान या निर्णयाप्रमाणे  केवळ 5 हजार रुपयेच मदत मिळणार होती. मात्र आता सुधारित निर्णयाप्रमाणे त्या शेतकर्‍याला 15 हजार रुपये मदत मिळेल.