Breaking News

मनसेकडून पीडब्ल्यूडी कार्यालयाची तोडफोड महामार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी


मुंबई : सायन-पनवेल मार्गावर मोठ्याप्रमाणावर पडलेल्या खड्ड्यामुळे होणार्‍या दुर्घटना टाळण्यासाठी गेल्या आठवड्यात महामार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी मनसेने केली होती. मात्र आजही खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे असल्याने मनसेच्य कार्यकर्त्यांनी सोमवारी तुर्भेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चे कार्यालय फोडले. शिवाय ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सायन-पनवेल महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यामध्ये दोन वर्षांपूर्वी मार्गावर बांधलेल्या उड्डाणपुलांचादेखील समावेश आहे. यामुळे सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच वाढत जात आहे. अशातच खड्ड्यांमुळे अपघातदेखील होत आहेत. मागील 10 दिवसात उरणफाटा व जुईनगर येथे खड्ड्यांमुळे बाईक अपघातात दोन जणांना बळी गेला. याबबत खात्याचे मंत्री व पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही मनसेने पोलिसांकडे केलेली आहे. तोडफोड आंदोलन मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, सचिव संदीप गलुगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तुर्भे येथील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत मनसे कार्यकर्त्यांनी त्याठिकाणावरून पळ काढला होता.