मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस ; समुद्रात उसळल्या अजस्त्र लाटा
मुंबई - आर्थिक राजधानीत रविवारी पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार पावसामुळे समुद्राला भरती आली असून बंधार्यावर अजस्त्र लाटा उठत आहेत. मरीन ड्राईव्हर तरुणाईने गर्दी केली आहे. आज विकेंड असला तरी कोसळणार्या पावसामुळे मुंबईकरांनी घरीच राहणे पसंत केले आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे आर्थिक राजधानीचे गणित बिघडले आहे. आजही मुसळधार पावसाला सकाळच्या सुमारास सुरुवात झाली. जोरदार वार्यासह कोसळणार्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलेले पहायला मिळत आहे. रेल्वे रुळावरही काही ठिकाणी पाणी साचल्याची माहिती मिळत आहे. मात्र, वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला नाही. मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मागील 8 दिवसांपासून पावसाने मुंबईत तळ ठोकला आहे. मुंबईच्या समुद्रात जवळपास 5 मीटरपर्यंतच्या लाटा उठत असल्याचे चित्र आहे.