पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातात 7 जणांचा मृत्यू
पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर 2 कार समोरासमोर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचे मृत्यू झाले आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास कार्ला फाट्याजवळ हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईच्या दिशेने मारुती स्विफ्ट कार जात होती. कार्लाजवळ आल्यानंतर भरधाव जात असलेल्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट मुंबईहून पुण्याकडे येणार्या दुभाजक तोडून लेनमध्ये घुसली. त्यावेळी समोरुन येणार्या सँट्रो (एमएच 12 इएक्स 1682) कारला धडक दिली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. स्विफ्टमध्ये लहान मूल असल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील मृतांची नावे अद्याप समजली नाहीत. दरम्यान, रविवारीची सुट्टी असल्याने या महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यातच भर रस्त्यात हा अपघात झाल्याने दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.