Breaking News

वारकर्‍यांच्या हस्ते शासकीय महापूजा !


मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांची माघार
 सोलापूर/प्रतिनिधी। 23
:
मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण देण्याचं ठोस आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरात विठूरायाची पुजा करू देणार असा आक्रमक पावित्रा  आंदोलकांनी घेतला आहे, अखेर मुख्यमंत्र्यांनी माघार घेत पंढरपूरात जाणार नसल्याचे रविवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत शासकीय पूजेचा मान वारकरीला देण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे. या पूजेला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जिल्हाधिकारी उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत आहे. 
पंढरपुरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये आणि त्याचा वारकर्‍यांना फटका बसू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.  
मराठा समाज आक्रमक झाला आहे. पंढरपुरातील शासकीय पूजा रोखण्याचा इशारा दिल्यानंतर रविवारी सकाळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या वाहनांचा ताफा अडविण्यात  आला आहे. सहकारमंत्री देशमुख हे मंगळवेढामार्गे पंढरपूरकडे जात होते. देशमुख यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही आहेत, मंत्र्याच्या वाहनांचा हा ताफा मंगळवेढा  येथील टोलनाक्यावर अडविण्यात आला आहे. आपल्या मागण्यासाठी आक्रमक पवित्र घेत मराठा समाजाने एस.टी ला लक्ष करत तोडफोड सुरू केली आहे. काही ठिकाणी एस.टी  बसेस पेटवल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांच्या माहिती आणि वारीत पसरणार्‍या अफवांमुळे वारकरी भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंढरपूर शहरात  जवळपास 7 ते 8 लाख भाविक दाखल झाले आहेत. आणखी 12 तासात जवळपास 5 लाख भाविक पंढरीत दाखल होण्याचा अंदाज आहे. पंढरपुरात स्वतः जिल्हाधिकारी डा ॅ.राजेंद्र भोसले,पोलीस अधीक्षक एस.विरेश प्रभू आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर ठिय्या मारून आहेत. मात्र, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलक ठाम असून राज्यातून भाविकांच्या  वेशात हजारो आंदोलक पंढरपुरात दाखल झाल्याची चर्चा सुरू आहे. इतर जिल्हातील मराठा समाजाने बैठका घेऊन तसा निर्णयदेखील घेतला असल्याचे समजते.
चौकट ः 
मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावू 
? क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी होणारे भुमीपूजन आणि त्यानंतरची सभा उधळून लावण्याचा इशारा मराठा क्रांती  मोर्चाने दिला. मराठा आरक्षणाची मागणी मान्य न केल्याने मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवित त्यांचा सोमवारचा दौरा होऊ देणार नसल्याचे पत्रक पिंपरी-चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाने  आज काढले. त्यामुळे अगोदरच काहीसा वादात सापडलेला हा दौरा आता आणखी अडचणीत आला आहे. पुणे शहरात बोकाळलेले अवैध धंदे, त्याबाबत वारंवार तक्रार व  आंदोलने करूनही पोलीस बंद करीत नसल्याने मुख्यमंत्र्यांचे स्वागत दारुची बाटली आणि मटक्याची चिठ्ठी व नंबर देऊन करण्यात येणार असल्याचे अपना वतन संघटनेने या  अगोदरच जाहीर केले आहे. त्यात हा दुसरा इशारा आणि तो सुद्धा मराठा मोर्चाने दिल्याने मुख्यमंत्र्यांचा दौरा आता खर्‍या अर्थाने अडचणीत आला आहे. 

चौकट ः 
कडेकोट सुरक्षा बंदोबस्त 
मुख्यमंत्र्यांना महापूजेला येऊ न देण्यावर मराठा क्रांती मोर्चा ठाम असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपुरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहरात तब्बल 6 हजार  पोलिसांचा फौजफाट तैनात करण्यात आला आहे. तसेच शहरात येणार्‍या वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत. पंढरपुरात विविध पालख्याच्या मधून लाखो भाविक  पंढरपूरात एकादशीच्या सोहळयास हजेरी लावणार आहेत. श्री विठ्ठलाची दर्शन रांग,संत ज्ञानेश्‍वर महाराज दर्शन मंडप, मंदीर परिसर प्रदक्षिणा मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात  आला आहे. चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, वाखरी पालखी तळ या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस लक्ष ठेवणार आहेत. तसेच चेन स्नॅचिंग विरोधी पथक, बॉम्ब शोधक नाशक  पथक, अशी विविध पथके भाविकाच्या सुरक्षेसाठी असणार आहेत. भाविकांनी कोणत्याही अफवेवर विश्‍वास न ठेवण्याच आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच काही संशयास्पद  आढळल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.