Breaking News

‘ चोंडी ‘ येथील गोंधळ प्रकरणी 15जणांना जामीन , डॉ. भिसे यांचा जामीन अर्ज फेटाळला


जामखेड ता.प्रतिनिधी - जामखेड तालुक्यातील चोंडी येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गोंधळ घातलेल्या 15 जणांना जामीन मंजूर केला आहे. मात्र डॉ. इंद्रकुमार भिसे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यानंतर कार्यकर्त्यांनी 11 कार्यकर्तांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात डॉ. इंद्रकुमार भिसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राम शिंदे यांचे भाषण सुरू असताना घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी मज्जाव केला असता झालेल्या झटपटीत एक पोलीस जखमी झाला. याप्रकरणी एकुण 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
शुक्रवारी अ‍ॅड सचिन कोरडेकर(बावडी, श्रीगोंदा), कोंडीबा महारनोर(दिघी ता. कर्जत), लघुघोडे (टाकळी काझी ता. शिरुर), शशीकांत चासकर (बावडी ता. पारनेर), किशोर आप्पासाहेब मासाळ, नितीन सुरेश मासाळ, संतोष बबन तावरे, राजेंद्र दयानंद कोळेकर, सुरज दत्तात्रय खोमणे, अनिल सदाशिव मासाळ व संदिप सदाशिव मासाळ सर्व रा. बारामती व इतर चार अशा पंधरा जणांचा जामीन अर्ज जामखेड न्यायालयाने मंजूर केला आहे. यानंतर सायंकाळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी यातील अकरा कार्यकर्त्यांना फेटा बांधून सत्कार करण्यात आला. 
डॉ. इंद्रकुमार भिसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी धनगर समाजाच्या वतीने चौंडी, जामखेड या ठिकाणी उपोषण व आंदोलने करण्यात आली होती. आरोपींनी देखील एक दिवस जेलमध्ये उपोषण केले होते. ही घटना संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता.
चौकट : डॉ. भिसे यांचा जामीन अर्ज फेटाळला 
सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. सतिश पाटील यांनी युक्तिवाद केला. कार्यक्रम स्थळी डॉ. भिसे यांना बंदी होती. त्यांनी आरक्षणाची पत्रके भिरकावुन गोंधळ घातला पोलीसांनी मज्जाव केला असता झालेल्या झटापटीत एक पोलीस जखमी झाला. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. यातील इतर आरोपी फरार आहेत. त्यांना जामीन देऊ नये. असा युक्तिवाद केला. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून डॉ. इंद्रकुमार भिसे यांचा जामीन अर्ज फेटाळला.