गांजवणे घाटात धोकादायक वळणावर कोसळली दरड
अकोले / प्रतिनिधी । 18 - तालुक्यातील राजूर जवळील गांजवणे घाटात धोकादायक वळणावर एक दरड कोसळली असून, रस्ताही खचला आहे. यामुळे प्रवाशांना या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. राजूर पासून 2 ते 3 किलोमीटर पासून सुरु होणारा गांजवणे घाट मुसळधार पावसामुळे खचला आहे. राजूर ही आदिवासी भागातील मुख्य बाजारपेठ असल्याने या रस्त्यानेच अनेक आदिवासी बांधव राजूर गावात दाखल होतात. हरिचंद्रगड, साकीरवाडी, मवेशी, शिरपुंजे, अंबीत आदी गावांकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. गांजवणे घाटात दरड कोसळली असून, ठिकठिकाणी रस्ता खचला आहे. रस्त्यावरचे कठडादेखील मध्येच पडलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. सध्या हरिचंद्रगड परिसरात पावसाळ्यात मुंबई, पुणे येथील पर्यटक ट्रेकिंग करण्यासाठी या परिसरात येत असतात. ही कोसळलेली दरड पर्यटकांच्या जीवावर बेतू शकते. या घाटातील रस्त्यांची प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी करत आहेत.