सोयाबीन विक्रीची घाई न करण्याचे पाशा पटेल यांचे शेतक-यांना आवाहन
सोयाबीनचे दर पडण्यात अनेक कारणे आहेत. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे देशाचे आयात-निर्यात धोरण. सध्या सोयाबीन आयातीवर कसलेही शुल्क नाही. त्याचा परिणाम म्हणून परदेशात स्वस्तात मिळणार्या सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात चालू आहे. या सर्व बाबींचा एकंदरीत परिणाम म्हणजे देशात सोयाबीनचे दर पडले आहेत.
पटेल यांचे म्हणणे असे की, कृषीमूल्य आयोगाने केंद्र शासनाकडे सोयाबीनवर 35 टक्के आयात शुल्क लावण्याची मागणी केली आहे. ही मागणी एक-दोन दिवसात मान्य केली जाईल. तसे झाले तर देशातील सोयाबीनचे दर किमान 35 टक्क्यांनी वाढणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन मराठवाडा विभागातील शेतकर्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये.
पाशा पटेल भाजपा विभागीय कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, तेल बिया आणि कडधान्य उत्पादनात देश स्वयंपूर्ण झाला आहे. केंद्र सरकारने वटाणे आयातीवर 50 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने गेल्या तीन महिन्यात अन्न-धान्य संबंधी तब्बल पाच अधिसूचना काढण्यात आल्या आहे. जुने झालेले कायदे बदलण्यात येत आहे.
सध्या देशात दाळवर्गीय उत्पादने वाढली आहेत. ही बाब लक्षात घेता दाळीच्या आयातीवर बंद घालावी. मागच्या वर्षी देशात 47 लाख टन तुरीचे उत्पादन झाले. देशाला प्रत्यक्षात 28 लाख टन तुरीची गरज आहे. हरभरा डाळीवर 30 टक्के आयात शुल्क लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. हरभरा दाळीच्या निर्यातीला केंद्र शासनाने परवानगी द्यावी अशी आमची मागणी आहे.
Post Comment