Breaking News

बहुचर्चित लांडे खून प्रकरण; भानुदास कोतकर सरेंडर झालेच नाही


 अहमदनगर । प्रतिनिधी । 29 - लांडे खुन प्रकरणातील फिर्यादी शंकरराव राऊत यांच्या पत्नी पार्वतीबाई राऊत यांच्याकडे आ.शिवाजीराव कर्डिले यांचा पंटर व भाजपचा कार्यकर्ता तसेच या खटल्यातील फुटीर साक्षिदार साहिबा विधाते याला पाठविण्यात आले. राऊत पती-पत्नींनी यापुढे नाशिक व मुंबईला न्यायालयात जाऊ नये, पुन्हा कोणतेही अर्ज करु नयेत, असे सांगून तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, मात्र ऐकले नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा दिला. विधाते याने राऊत यांच्याबरोबर मोबाईलवरुन संभाषण केले. त्यानंतर राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार पोलिसांकडे केली. तक्रार दाखल करतांना त्यांनी पुराव्या दाखल मोबाईल संभाषणाच्या सीडी दिल्या. मात्र, याबाबत तपासी अधिकारी अनंद भोईटे यांनी कोणतीही दखल घेतली नाही. मुंबई उच्च न्यायालयात जामीन रद्द करा अशी मागणी करुन हे पुरावे दाखल केले. आरोपी कोतकर जामीनावर असतांना विविध विकासकांमांना उपस्थित होते. त्यांचे फोटेही मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात येऊन आरोपीला कोणताही आजार नाही. तो जामीनाचा गैरफायदा व गैरवापर करीत आहे. आरोपीपासून कुटूंबाला धोका होऊ शकतो. अशी मागणी फिर्यादी राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली. मोबाईलवरील संभाषणाचे रेकॉर्ड साहेबा विधाते यांच्यासमोर न्यायालयात वाजवून दाखविण्यात आले. यावेळी हा आवाज माझाच आहे. अशी कबुली साहेबा विधाते याने दिली. शिरुर व पुण्याला राऊत यांच्याबरोबर कोतकर यांना बैठका घ्यावयाच्या आहेत. असाही निरोप राऊत यांना आला होता. त्याचे पुरावे उच्च न्यायालयात देण्यात आले. 
 27 जानेवारीला यावर सुनावणी झाली. सरकारी वकील अ‍ॅड. विरा शिंदे व जितेंद्र रामूगडे यांनी अहवाल मांडून म्हणणे सादर केले. अ‍ॅनजिओ ग्राफी करायला 1 तास पुरेशा होतो. त्यानंतर पुढे कोणते व कसे उपचार करायचे याची प्रक्रिया निश्‍चित करण्यात येते. सरकारकडे आरोपीवर सर्व ते उपचार करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. सरकार उपचार करु शकते असे सांगून सरकारी वकीलांनी जामीन वाढवून देण्यास विरोध केला. आरोपी कोतकर शंभर दिवसांपेक्षा अधिक मेडिकल ग्राऊंडच्या जामीनावर असून त्याने या काळात काहीही केलेले नाही असे ही वकीलांनी सांगितले. फिर्यादी राऊत यांचे वकील अ‍ॅड.अनिलकुमार पाटील व अ‍ॅड.जितेंद्र गायकवाड यांनीही युक्तीवाद केला. राऊत यांचे पुर्वीचे वकील अ‍ॅड.अशिष मेहेता समाधानकारक काम करीत नसल्याने त्यांनी वकीलांमध्ये बदल केला. आरोपी कोतकर यांच्यातर्फे अ‍ॅड.महेश जेठमलानी यांनी काम पाहिले. राऊत यांनी जामीन फेटाळला.यासाठी दोन अर्ज केले होते. तर कोतकर यांनी एक अर्ज दाखल केला होता. सर्व अर्ज निकाली काढण्यात आले. अशोक लांडे खुनप्रकरणाच्या सुनावणीचे काम नाशिक जिल्हा न्यायालयात सध्या चालू आहे. दोन्ही बाजूकडून साक्षीपुरावे दाखल करण्याचे काम पुर्ण झाले आहे. आता केवळ युक्तीवाद बाकी आहे. फेब्रुवारी महिन्यात सर्व वकीलांचा युक्तीवाद होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या खटल्याचा निकाल लागणार आहे. या बहुचर्चित खटल्याकडे नगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांबरोबरच सर्व सामान्यांचे लक्ष लागले आहे.