जलयुक्तच्या कामाने तालुका आज टँकरमुक्त - पालकमंत्री शिंदे

तालुक्यात मागील 2 वर्षामध्ये केलेल्या जलयुक्तच्या कामामुळे आज तालुका टँकरमुक्त झाला असल्याचे समाधान जलसंधारणमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांनी कर्जत येथील आढावा बैठकीत व्यक्त केले.कर्जत येथे खरीप हंगामपुर्व आढावा व नियोजन सभेचे आयोजन जलसंधारणमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी तालुक्यातील कृषी विभागाचा आढावा सादर केला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारी, कृषी विकास अधिकारी सुनील राठी, रोहयो उपजिल्हाधिकारी वामन कदम, पंचायत समितीच्या सभापती पुष्पा शेळके, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश शिंदे यांसह गावांचे सरपंच, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक यावेळी उपस्थित होते. 


अनेक गावच्या सरपंचानी यावेळी मांडलेल्या अडचणींवर ना. शिंदे यांनी तातडीने मार्ग काढला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गेली 3 वर्षातील जलयुक्तची सर्व कामे जूनअखेर पूर्ण करण्याची हमी दिली. यावेळी जलसंधारणमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांनी तालुका टँकरमुक्त झाला असून योग्य नियोजन केल्याने त्याचा लाभ थेट शेतकर्‍यांना झाला पाहिजे तालुक्यात ट्रॅक्टर वाटपाचा 65 चा ईष्टांक असताना 131 ट्रॅक्टर वाटप केले असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जत तालुक्यात कृषी विभागाचे काम उत्तम असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. याच बरोबर कुकडीच्या पाण्याचा योग्य गेज मिळाला पाहिजे, ज्यांचेसाठी पाणी ठरवले आहे त्यांना ते मिळाले पाहिजे, अन्यथा जबाबदार व्यक्तीवर कार्यवाही करा असे स्पष्ट निर्देश यावेळी त्यांनी दिले.