Breaking News

एनएसजीची वेबसाईट हॅक, पंतप्रधान मोदींविरोधात मजकूर प्रसिद्ध

नवी दिल्ली, दि. 02 - एनएसजी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा दलाची वेबसाईट हॅक करुन त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘अलोन इन्जेक्टर’ या हॅकर ग्रुपने वेबसाईट हॅक केल्याची माहिती आहे. हॅकर्सनी वेबसाईट हॅक केल्यानंतर पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं. पोलिस सामान्यांना मारहाण करतानाचे फोटो प्रसिद्ध करत हॅकर्सनी त्यावर ‘काश्मीर मुक्त करा,’ असा मजकूर लिहिला आहे.
एनएसजीचे संकेतस्थळ पाकिस्तानमधील हॅकर्सकडून हॅक करण्यात आलं असावं, अशी शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. या संकेतस्थळावर पाकिस्तान समर्थनार्थ घोषणादेखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. याआधीही लिजीयन ग्रुपने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक केलं होतं. त्यानंतर काँग्रेसचं अधिकृत ट्विटर हँडलही हॅक करुन आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता.