पंतप्रधान कार्यालयाकडून तक्रारीची दखल घेत निर्देश आल्यामुळे अतिक्रमणे हटविली

जालना, दि. 11, नोव्हेंबर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स या घोषणेचा प्रत्यय जालना येथील त्रस्त गौरव किरणकांत भरवाडा यांना आला. वारंवार तक्रार करूनही पालिका दखल घेत नसल्याने भरवाडा यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या ‘पीएमओपीजी’ या पंतप्रधान कार्यालयाच्या नागरी सुविधांसाठी असलेल्या वेबपोर्टलवर अतिक्रमणाबाबत तक्रार केली. या तक्रारीची संवेदनशीलपणे तातडीने दखल घेत प्राप्त निर्देशानुसार नगरपालिकेने शहरातील सरोजिनी रोडवरील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणे गुरुवारी हटवली. आपल्या मेडीकल एजन्सीच्या एजन्सीच्या बाजूला असणा-या सार्वजनिक रस्त्यावर अवैधरीत्या दुकाने व टप-या थाटण्यात आल्याचे भरवाडा यांनी या तक्रारीत नमूद होते. भरवाडा यांच्या वेबपोर्टलवरील तक्रारीची दखल घेत दिल्लीहून नगरपालिका प्रशासनाला सदर अतिक्रमण हटविण्याचे निर्देश प्राप्त झाले होते. त्यानुसार मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या आदेशाने आज सकाळी हे अतिक्रमण हटविण्यास पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. विजया बँकेसमोरील अवैध दुकानेही पालिकेच्या पथकाने काढून टाकली. स्वच्छता विभागप्रमुख माधव जामधडे, स्वच्छता निरीक्षक लोंढे यांच्यासह 125 पुरुष व महिला सफाई कामगार, दोन पोलीस निरीक्षक 60 महिला व पुरुष पोलीस कर्मचाजयांनी या कारवाईत सहभाग घेतला. एक जेसीबी आणि सहा ट्रॅक्टरच्या मदतीने येथील टप-या, पत्र्याचे शेड व अन्य दुकाने हटविली.