भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवरील जीएसटी रद्द करा - आर्य संगीत प्रसारक

पुणे, दि. 11, नोव्हेंबर - केंद्र सरकारने अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवर लावलेल्या 28 टक्के जीएसटीमुळे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकीटांच्या किमती वाढत असून त्यामुळे श्रोत्यांची संख्या रोडावेल आणि याचा शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारावर नकारात्मक परिणाम होईल, त्यामुळे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवरील जीएसटी रद्द करावा, अशी मागणी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी केली.
केंद्र सरकारने शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचा ’लग्झुरियस सेगमेंट’मध्ये समावेश करत 250 रुपयांहून अधिक तिकीट असणा-या कार्यक्रमांच्या तिकिटावर 28 टक्के जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे श्रोत्यांना वाढीव तिकिटाचा भार सहन करावा लागत आहे. अशा पद्धतीने तिकीटांची किंमत वाढली तर श्रोत्यांच्या संख्येवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊन शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचा श्रोतावर्ग कमी होईल. तसेच तिकिट कमी ठेवले तर आजच्या काळात कार्यक्रमाच्या खर्चाचा ताळेबंद बांधणे आयोजकांना शक्य होणार नाही. अशा पद्धतीने दुहेरी कोंडीत आयोजक आणि प्रेक्षक सापडले असून शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना लग्झुरियस सेगमेंटमध्ये न टाकता त्यांवरील जीएसटी रद्द करावा, अशी मागणी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.