राहुरीत अल्पवयीन मुलाचा जळालेला मृतदेह आढळला
घटनेमुळे उलट सुलट चर्चेला उधाण
राहुरी प्रतिनिधी, दि. 11, नोव्हेंबर - राहुरी तालुक्यातील नगर मनमाड राज्य महामार्गावर गुहा शिवारात रामदेव धाब्यासमोर आज दि. 11 सकाळी एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह अर्धवट जळित अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची ओळख न पटल्याने हा मृतदेह कोणाचा, त्याला जाळल्याचे कारण काय, यातील आरोपी कोण या सर्व प्रश्नाची उत्तरे शोधण्याचे काम पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे राहुरी परिसरात उलटसुलट घटनेला उधाण आले आहे.राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषद व गुहा ग्रामपंचायत सीमेवर नगर- मनमाड राज्य महामार्गापासून 10 दहा फूट अंतरावर दहा ते बारा वर्षे वयाच्या मुलाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळळताच जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा, पोलीस उपअधीक्षक अरुण जगताप, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड, उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, डी. डी. गायकवाड, सतिष शिरसाठ, हवालदार राजेंद्र साळवे, पोलिस नाईक गौतम लगड, हर्षवर्धन बहीर, निलेश मेटकर, सुरेश भिसे, प्रभाकर शिरसाठ आदींनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी नगर येथील वैज्ञानिक तपास पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. श्वान पथकातील मिश्का या श्वानाला मृतदेहाजवळील काही वस्तूंचा वास घेतला. परंतु हे श्वान जागेवरच घुटमळल्याने पोलिसांना तपासकरणे जिकरीचे झाले आहे. यावेळी श्वानपथकातील उपनिरीक्षक एस. डी. बावळे, आर. आर. विरकर होते.
जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी घटनेची पाहणी करून पोलिस कर्मचार्यांना मार्गदर्शन केले. सदर मृतदेह हा देवळाली प्रवरा व गुहा सीमेवर असल्याने या ठिकाणी राहुरी, देवळाली प्रवरा, गुहा येथील आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व तलाठ्यांनी हद्दीचा प्रश्न उपस्थित करत घटनास्थळी येण्यास टाळाटाळ केली. घडलेल्या घटनेचे गांभिर्य ध्यानात न घेता टाळाटाळ केल्याने पोलिस प्रशासनास असहकार्य होत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळाले. लोणीप्रवराच्या वैद्यकीय अधिकार्यांना पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अखेरीस तासाभरानंतर राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सुधीर क्षीरसागर घटनास्थळी दाखल झाले. शवविच्छेदन करुन पुढील तपासकामी शोध सुरु झाला. त्यामुळे तपास करताना पोलिसांना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
घटनास्थळी राज्यमार्गावर बघ्यांची गर्दी जमा झाली होती. राहुरी तालुक्यातील विद्यापीठ परिसरात दगडाने ठेचून झालेल्या खुनाला अद्याप महिना उलटत नाही. तोच गुहा परिसरात एका दहा ते बारा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलाचा दुसरा खून झाल्याने राहुरी पोलीस चक्रावून गेले आहेत. सदर मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. पुढील तपास पो. नि. प्रमोद वाघ व राहुरी पोलिस करीत आहेत.
Post Comment