Breaking News

मामा तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी टाटा ट्रस्ट 30 कोटी रुपये देणार

नागपूर, दि. 23, ऑगस्ट - पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी (मामा) तलावाच्या माध्यमातून भात उत्पादनासोबत मत्स्य पालनाला प्रोत्साहन मिळावे तसेच  येथील शेतकर्‍यांच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या 1 हजार 420 माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन सुरु करण्यात  आले आहे. या महत्वकांक्षी उपक्रमाला टाटा ट्रस्ट सहकार्य करणार असून सामाजिक दायित्व निधीमधून 30 कोटी रुपयाचा निधी देणार असल्याची माहिती  विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आढावा तसेच नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली  जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पुनरुज्जीवनामुळे होणार्‍या प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी टाटा ट्रस्टच्या सहकार्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी टाटा ट्रस्टचे विभागीय प्रमुख मुकुंद गुप्ते, विदर्भ प्रमुख राहुल जांभळे, अनंत अक्षय, भक्ती ढवळे, सुधीर नहाते, प्रफुल्ल खेडेकर, किरण वाघमारे  यांचेसह महसूल उपायुक्त पराग सोमण, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता शिरीष आपटे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनामध्ये नागपूर विभागातील जिल्ह्यातील सिंचनाला चालना मिळणार असल्यामुळे हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण  करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी 1 हजार 419 कोटी रुपयाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून प्रत्यक्ष कामाला  सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाला 161 कोटी रुपये प्राप्त झाले असून यामध्ये 261 कामे पूर्ण झाली असल्याचे सांगतांना विभागीय आयुक्त अनूप कुमार  म्हणाले की, कृषी विकासासोबतच उत्पादन वाढ तसेच पर्यावरण संवर्धन व शेतकर्‍यांच्या आर्थिक जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी टाटा ट्रस्ट  महत्वपूर्ण सहकार्य करणार आहे.