Breaking News

वृक्षारोपणाचा आज सर्वदूर कार्यक्रम

बुलडाणा, दि. 01 - राज्य सरकार उद्या 1 जुलै 2017 रोजी  महत्वांकांक्षी चार कोटी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेणार आहे. यावर्षी वृक्ष लागवड मोहिम 1 ते 7 जुलै 2017 सप्ताहाभर चालणार आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. हरीत चळवळ बनलेल्या या मोहिमेत सर्वांनी हिरीरीने सहभाग घ्यावा. सामाजिक वनीकरण व वन विभाग यांच्याकडून रोपे मिळवून घ्यावीत. रोपे मिळण्यामध्ये काही अडचण असल्यास सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या कार्यालयांशी संपर्क करावा. वृक्षारोपण करून पर्यावरणाचा ढासाळलेला समतोल राखण्यामध्ये शासनाला मदत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले  आहे.
जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी सर्वप्रथम वृक्षारोपण जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण व वन विभागाच्यावतीने वृक्षारोपणाचा मुख्य कार्यक्रम सकाळी 8 वाजता खामगांव रस्त्यावर सामाजिक वनीकरण विभागाच्या रस्त्या शेजारील जागेत विजय हॉटेलजवळ होणार आहे.
पर्यावरण समतोल राखणार्‍या या चळवळीमध्ये जिल्ह्यातील सामाजिक संस्था, खाजगी व्यापारी संस्था, बँका व खाजगी कंपन्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेवून वृक्षारोपण करावे. घराच्या परीसरात, खुली जागा असेल तिथे, कार्यालय, शाळा, महाविद्यालये परीसर, खाजगरी कंपनी परीसर व वैयक्तिक स्तरावर वृक्षारोपण करावे. रोपे खाजगी व्यवस्थापनही देत आहेत. त्यांचाही लाभ घ्यावा. या बाबत काही अडचण असल्यास सामाजिक वनीकरण व वन विभागाशी संपर्क करावा.