Breaking News

ग्राम विकासाला चालना देऊन करणार कायापालट : श्‍वेता महाले

बुलडाणा, दि. 01 - खरा भारत गाव खेड्यात वसला असून या गावांचा सर्वांगिण विकास झाला तरच देश प्रगती पथावर जाईल, म्हणून लोकप्रतिनिधी या भूमिकेतून आपण ग्राम विकासाला चालना देऊन गावाचा कायापालट घडवू असे अभिवचन जि प सभापती श्‍वेताताई महाले पाटील यांनी देवदरी आणि एकलारा येथील ग्रामस्थांना दिले. 28 जून रोजी या गावांना दिलेल्या भेटी प्रसंगी गावातील समस्या जाणून घेत त्यांनी गावकर्‍यांशी संवाद देखील साधला.
चिखली तालुक्यातील देवदरी हे नेहमी उपेक्षित व दूर्लक्षित असलेले गाव आहे. बर्‍याच वर्षांपासून येथे ना आमदारांनी भेट दिली ना स्थानिक स्वराज्य संस्थेचा कुणी पदाधिकारी येथे आला. अशा समस्याग्रस्त गावातील वंचित लोकांचा आवाज ऐकण्यासाठी, त्यांची गार्‍हाणी ऐकून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्‍वेताताई महाले पाटील तेथे पोहचल्या. देवदरी येथील रहिवाशांशी त्यांनी संवाद साधला. यातून अनेक समस्या गावकर्‍यांनी त्यांच्या समोर मांडल्या. भोरसा भोरसी ते देवदरी रस्त्याचे खडिकरण व डांबरीकरण, अनेक वर्षांपासून रखडलेले गावाचे पुनर्वसन, पेनटाकळी प्रकल्पाच्या भिंतीचा प्रश्‍न सोडवून स्थानिक लोकांना मुलभूत सुविधा पुरवण्याची ग्वाही श्रीमती महाले यांनी दिली. अशाच प्रकारे एकलारा येथे सुध्दा श्‍वेताताई महाले यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान गावातील वेगवेगळ्या प्रश्‍नांचा त्यांनी वेध घेतला. हिंदू स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण, मारूती मंदिर ते स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता, बौध्द स्मशानभूमी व मुस्लीम कब्रस्तानला संरक्षक भिंत, बस स्टँड ते सोनार गल्ली पर्यंतचा रस्ता, गरीब व गरजू लाभार्थींना घरकुल वाटप, किसनदेव महाराज संस्थान जवळील डिपी, विद्युत खांब बदलणे, पशु वैद्यकीय दवाखान्यात शिपायाची नियुक्ती, मुस्लीम शादिखान्याचे अर्धवट राहिलेले बांधकाम पूर्ण करणे, ऊर्दू शाळेसाठी रस्त्याचे बांधकाम आदि प्रश्‍न लवकरच मार्गी लावण्यासाठी तसेच आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असा विश्‍वास त्यांनी एकलारकरांना दिला. या दोन्ही गावांना दिलेल्या भेटी प्रसंगी भाजपा तालुका उपाध्यक्ष गजानन भुसारी, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष संदीप म्हस्के, भोरसा भोरसी ग्रा.प.सदस्य विष्णू मुरकुटे, संतोष काळे, अमोल ढोरे, रमेश आकाळ, नामदेव मुरकुटे, राजेंद्र भूसारी, बलदेवसिंग सपकाळ, देवदरीचे पोलीस पाटील प्रकाश पाटील, भारत मुरकुटे, दिलीप जाधव यांच्यासह एकलारा येथील गजानन अंभोरे, अशोक पाटील, रामकृष्ण अंभोरे, संतोष हिंगे, संतोष गोसावी, राजेश घेवंदे, फकिरा अंभोरे, अनिल अंभोरे, संतोष अंभोरे, पशु वैद्यकीय दवाखान्यातील डॉ वाळेकर, डॉ.किरण सोनुने, डॉ अनिल सावळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.