Breaking News

चंद्रकांतदादा आता आमचा रागहि बघा

नेर्ले, दि. 26 -  सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमचं प्रेम बघितलंय, आता त्यांना रागही बघायला मिळेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. कापूसखेड (ता. वाळवा) येथील बिरोबा मंदिर सभामंडपाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वाळवा तालुका धनगर महासंघाचे अध्यक्ष मधुकर वीरकर यावेळी उपस्थित होते.
श्री. शेट्टी म्हणाले, कायद्याचे उल्लंघन करुन साखर कारखानदार पैसे लुबाडण्याच्या प्रयत्नात आहेत. 80-20 टक्क्यांच्या फॉर्म्युल्यानुसार साखरेच्या दरातील 80 टक्के रक्कम मुकाट्याने कारखानदारांनी द्यावी, यात सहकार मंत्र्यांनी कारखानदारांना मदत केल्यास महाराष्ट्रात फिरु देणार नाही. आम्ही शेतकर्‍यांच्या बाजूनेच आहोत.पूर्वी कारखान्याचे अध्यक्ष, संचालक यांच्याकडे कुणीही तक्रार करत नव्हते. परंतु आज शेंबडं पोर देखील  भाषण बंद करुन बिल कधी देताय ते बोला, असं म्हणतंय हीच आमची ताकद आहे. सहकार मंत्र्यांनी कारखानदारांची बाजू घेतली तर याबद्दल मुख्यमंत्र्यांना जाब विचारनेच पण सहकार मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही. शेतकर्‍यांसाठी गाळ काढण्यासाठी जिल्हा नियोजनामध्ये दोन एक्साव्हेटरची सोय केली असून डिझेल टाकून शेतकर्‍यांनी ते वापरावेत. सदाभाऊ खोत म्हणाले, माढामध्ये मी उभा राहिल्यानंतर 90 टक्के नोट आणि वोट मला धनगर समाजानेच दिले. खासदारांच्या विकास निधीला काही गावात स्वीकारले जात नाही. पण तुम्ही तसे करु नका. ज्यांचा विकासनिधी येतो त्यांचा जरुर घ्या. मी देखील माझ्या गावात आमदार 
जयंत पाटील, पतंगराव कदम यांचा विकासनिधी खर्च केला आहे. जिथे अन्याय तिथे आम्ही उभे राहू. कुणीही भीती बाळगण्याचे कारण नाही.
ते पळपुटे निघाले
कापूसखेड येथील एका शेतकर्‍याने सदाभाऊंना वाळवा तालुक्यात आमदारकीची उमेदवारी का दिली नाही, असा सवाल जाहीरपणे केला. त्यावर श्री. शेट्टी म्हणाले, पाच उमेदवार उभे केले होते, त्यांच्या प्रचारासासाठी सदाभाऊ हुकमी एक्का होता, पण वाळवा तालुक्यात ज्याला आम्ही उमेदवारी दिली तो उमेदवारच पळपुटा निघाला. नुकतेच शिवसेनावासी झालेल्या अभिजित पाटील यांच्यावर त्यांनी नामोल्लेख न करता टीका केली.