Breaking News

कराडमध्ये भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ

कराड, ता. 3 - कराड नगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर लढविणार असून, कराड येथील प्रितीसंगम घाटावर महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन करून भाजपाच्या उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला. 
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. रोहिणी शिंदे, भाजपा शहराध्यक्ष एकनाथ बागडी, नितीन वास्के, उमेश शिंदे, श्री. पेंढारकर यांच्यासह भाजपाचे सर्व उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराड शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही. भाजपा ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढविणार असून, भाजपाच्या हातात सत्ता दिल्यास कराडला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी ना. चरेगावकर यांनी दिली.
केंद्रासह राज्यात भाजपाची सत्ता आहे. कराड शहराचा सर्वांगीण विकास फक्त भाजप करू शकते, असे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रोहिणी शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.