Breaking News

भ्रष्टाचार समाजाला लागलेली कीड : अश्‍विन मुद्गल

सातारा दि. 03 (प्रतिनिधी) : भ्रष्टाचार समाजाला लागलेली कीड आहे. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. लाच मागत असेल किंवा लाच देत असेल अशा लोकांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 31 ऑक्टोबर या जन्मदिवसापासून एक आठवड्यासाठी दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येतो.  त्या अनुषंगाने नियोजन भवनात आज जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा, नगरपरिषद प्रशासन अधिकारी किरण यादव उपस्थित होते.
भ्रष्टाचाराच्या समुळ उच्चाटनासाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने प्रत्येक शासकीय कार्यालयांवर करडी नजर ठेवावी, असे सांगून जिल्हाधिकारी मुद्गल म्हणाले, कोणी लाच घेताना सापडले असल्यास त्याच्यावर कडक शासन करावे. अशा लोकांची शासनाला गरज नाही. देशाच्या प्रगतीत भ्रष्टाचार हा मोठा अडथळा आहे. हा अडथळा दूर केल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. प्रत्येक अधिकार्‍यांनी, कर्मचार्‍यांनी दक्ष राहून जबाबदारी काय आहे याचे भान ठेवून आपली भूमिका बजावली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने राज्यपाल आणि मुख्यमंत्री महोदयांचे संदेश यावेळी सुहास नाडगौडा यांनी वाचून दाखविले. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.