Breaking News

मराठवाड्याच्या विकासासाठी आंदोलन करावे लागेल,दैनिक लोकमंथनच्या औरंगाबाद आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात खासदार चंद्रकांत खैरे यांचे प्रतिपादन

औरंगाबाद / प्रतिनिधी । मराठवाड्यावर विकासाच्या बाबतीत अन्याय होतो आहे. तो अन्याय दूर करण्यासाठी पुन्हा एकदा मराठवाडा विकासाचे आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेनेचे नेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला.दैनिक लोकमंथन च्या औरंगाबाद आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्ताने ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून महापौर नंदकुमार घोडेले, माजी खासदार उत्तमसिंह पवार, ओबीसीचे नेते आणि भारिप-बहूजन महासंघाचे नेते रामभाऊ पेरकर, माजी नगरसेवक किशोर नागरे, दैनिक लोकमंथनचे मुख्यसंपादक अशोक सोनवणे, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ, माहिती अधिकारी मुकूंद चिलवंत, दैनिक तरूण भारतचे संपादक अशोक मुंदडा, बुलडाणा जिल्हा परिषद सदस्य डी. पी. शिपणे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग स्वामीदार चौबे, उद्योजक विनोद माळी, श्री. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलतांना खासदार खैरे म्हणाले, मी या विभागात आयआयटी, आयआयएम आणि इतर संस्था आणण्यासाठी प्रयत्न केले. पण ते विदर्भात नेले. त्यांना विदर्भ वेगळा करायचा आहे. तर करावा, पण आमचा विकास त्यांनी खुंडवु नये. मी औरंगाबादसाठी मेट्रोचा प्रकल्प आणण्यासाठी योजना तयार केली. ती नागपुरला झाली. आता दक्षिण-मध्य रेल्वेत असणारे नांदेड डिव्हीजन सेंट्रल रेल्वेत समाविष्ट करण्यासाठी 13 व्या लोकसभेत ठराव केला. पण राजकारणामुळे ते होऊ शकले नाही. पण मी हार मानलेली नाही. या मराठवाड्यावर सातत्याने अन्याय होतो आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठवाडा विकास आंदोलन करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी मी संबंध ठेवत नाही, असे सांगतांना मी रागावलो तरी बातमी होते आणि बोललो तरी हे लोक बातमी करतात. पण अतीप्रसिद्धी ही वाईट असते. हे सांगतांना खा. खैरे म्हणाले, मी विधानसभेत राजेंद्र दर्डांचा पराभव केला. त्यावेळी दर्डांनी माझ्या विरोधात त्यांचे पेपर उतरविले होते. दररोज माझ्या विरोधात लिखाण केल्याने मला त्याचा फायदा झाला आणि त्यांचा पराभव करू शकलो. त्यामुळे वर्तमानपत्रात दररोज फोटो चांगला नसतो, असा सल्लाही त्यांनी महापौर नंदकुमार घोडेलेंना दिला. रेल्वेच्या प्रश्‍नावर त्यांनी लोकसभा बंद पाडली होती, याचा किस्साही यावेळी खा. खैरेंनी सांगितला. 
समृद्धी महामार्ग हा विदर्भातील लोकांना मुंबईत लवकर पोहचण्यासाठी तयार केला जात आहे. पण त्यामध्येही अधिकार्‍यांनी एका गावातील शेतकर्‍यांना एक भाव आणि दूसर्‍या गावातील शेतकर्‍यांना एक भाव असे दिले. त्याच्यासाठी शिवसेनेने आंदोलन केले. त्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पळशी गावात आले. त्यामुळे त्या गावातील लोकांना कमी भाव दिला. त्याचा राग आल्याने मी त्या सगळ्या अधिकार्‍यांची एसीबीतर्फे चौकशी लावली आहे. त्या बातम्या पत्रकारांनी केल्या पाहीजे, असा सल्लाही खा. खैरेंनी दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमंथनचे निवासी संपादक अभय निकाळजेंनी केले.
त्यांनी यावेळी खा. खैरे, महापौर श्री. घोडेले आणि उत्तमसिंह पवार हे बातम्यांचे माझे सोर्से होते. त्यामुळे औरंगाबाद शहरात आवृत्ती सुरू करतांना ते परखडपणे आपले मते मांडतील. त्याचप्रमाणे बातम्यांचे विषयही सांगतील, असे ते म्हणाले. तोच धागा पकडून महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, मी बातम्यांचा सोर्स आहे. पण सोर्स क्लिल करू नका. शहरात अनेक वर्तमानपत्र सुरू होऊनही वर्तमानपत्रांचे महत्व कमी होणार नाही. त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनी चालतांना शहराच्या विकासासाठीही लोकमंथनने काम करावे, अशी आपेक्षा महापौर घोडेले यांनी व्यक्त केली. यावेळी बोलतांना मुख्य संपादक अशोक सोनवणे म्हणाले, दहा वर्षात लोकमंथनने जी वाटचाल केली, ती वाटचाल कुणाचीही बाजु न घेता केली. आम्ही कुणाचे झालोही नाही आणि होणार ही नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा होऊन 2019 पर्यंत आम्ही संपुर्ण मराठवाडा काबिज करण्यासाठी येत आहोत. वृत्तपत्र हे चुक झाली, तर त्यावर अंकुश ठेवण्यासाठी काम करते. त्यामुळे आम्हाला कमावण्याची आपेक्षा नाही. त्यामुळे आम्हाला वाचक महत्वाचा आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही आत्तापर्यंत वाटचाल करीत आहोत. त्यामुळे विकासासह ओबीसी, अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्‍नावर आम्ही काम करू, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर माजी खा. उत्तमसिंह पवार यांनी वर्तमानपत्र चालविणे अवघड असते. त्याचा मी अनुभव घेतला आहे. त्यात मी आणि खा. खैरेंनी एकमेकांच्या विरोधात निवडणुक लढविली, पण आमची दोस्ती मात्र कायम राहीली. यावेळी बोलतांना श्री. पवार यानी पेडन्युज पासून ते बातम्यांचे किस्से सांगत उपस्थितांना हसवले. मी स्वतः फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा पाईक आहे. पण मी जर कधी चुकलो तर माझाही कान पिळा, असे ते म्हणाले. यावेळी माळी समाजाचे नेते आणि भारिप-बहूजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष रामभाऊ पेरकर यांनी माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार छगनराव भुजबळ यांचा संदेश आणि भाषण यावेळी वाचून दाखविले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कैलास हरिभाऊ राऊत यांनी केले तर युनिट मॅनेजर बाबुराव गोरे यांनी आभार मानले.