सदाशिवराव पाटील यांचा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा
संपूर्ण जिल्ह्यात तसेच तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक झाली नाही. याबाबत दुःख व्यक्त करत पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे पत्र पाठवले आहे. त्यासोबत प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा पाठविला आहे.
या पत्रात पाटील यांनी म्हटले आहे की, आपण मला प्रदेश उपाध्यक्षपदाचे काम करण्याची संधी दिली, याबाबत धन्यवाद. परंतू, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यात आणि जिल्ह्यात पक्षाची कामगिरी समाधानकारक झाली नाही. याचे दुःख आहे. परंतू, मागील वर्षभरात जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना जिल्ह्यातील गटबाजी संपवण्यात अपयश येत आहे. तसेच नजीकच्या काळात यात फारसा फरक होईल असे वाटत नाही. पक्षातील अंतर्गत गटबाजी, व्यक्ती केंद्रीत राजकारण आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी झाली. याचा परिणाम म्हणून निवडणुकीत पक्षाची झालेली सुमार कामगिरी दिसून आली. याची जबाबदारी म्हणून आपण प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून या पुढील काळात कार्यरत राहीन, असेही पाटील यांनी पत्रात म्हटलेे आहे.