Breaking News

अग्रलेख - प्रदुषणाच्या विळख्यात...


देशात सध्या प्रदुषण वाढत चालल्याने अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. हवा, जल, ध्वनी आदींचे प्रदुषण घातचकच आहे. उदाहरणार्थ, हवेमध्ये डीझेल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः जागतिक तापमानवाढ, उष्माघात, त्वचेचा कर्करोग, दमा आदीसारखे धोके निर्माण होतात. भारतातील प्रदूषणाची पातळी वाढत असल्याचे अनेक वर्षांपासून निदर्शनास येत आहे. मात्र त्यावर वेळीच उपाययोजना न केल्यामुळे ही पातळी सातत्याने वाढत आहे. नुकत्याच जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिध्द केलेल्या अहवालात भारतातील ही चिंताजनक परिस्थिती दर्शविण्यात आली आहे. जगातील सर्वाधिक वीस प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील 14 शहरांचा समावेश आहे. जगातील 20 शहरांपैकीह 14 प्रदूषित शहरे भारतात आहे, ही परिस्थिती अतिशय चिंताजनक आणि भयावह आहे. प्रदूषणाची पातळी जर अशीच वाढत राहिली, तर मानवी जनजीवन विस्कळीत होण्याला वेळ लागणार नाही. या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मानवी जीवन निकोप राहण्यासाठी मानवाला ज्याप्रकारे सकस आहाराची गरज असते, त्याचप्रकारे त्याला शुध्द हवेची देखील आवश्यकता असते. मात्र ही शुध्द हवा आता पारखी हावू लागली असून, हवेतील वाढते प्रदूषण मानवी जीवनाची साखळीमध्ये बिघाड निर्माण करू पाहत आहे. अर्थातच प्रदूषण हे देखील मानवनिर्मित असून, त्याला अटकाव देखील मानवच करू शकतो. मात्र विकासाची उंचउंच झेप घेण्याच्या हव्यासापायी निसर्गांच्या संकल्पना तो मोडीत काढू लागला आहे. मानवी प्रदूषणात ज्या ज्या मानवी क्रियेमुळे हवेचे प्रदूषण होते त्या क्रियांचा समावेश होतो. सतत धुर ओकणारे कारखाने, अपायकारक वायू सोडणारी वाहने, विमाने, कीटक नाशके, जंतूनाशके यांचे सोडलेले फवारे, अणुबाँब सारखे शास्त्रीय प्रयोग इत्यादी सर्वांचा समावेश मानवी प्रदूषणामध्ये होतो. वाहनामुळे होणारे प्रदूषण हे सर्वात जास्त प्रमाणात असते. वाहनांच्यामुळे होणार्या प्रदूषणात कार्बनमोनोक्साईडचे प्रमाण दोन तृत्यांश इतके असते. तर हायड्नेकार्बन आणि नायट्न्स ऑक्साईड निम्या प्रमाणात असते. वीजनिर्मिती उर्जा निर्मितीसाठी लागणारी इंधने, कोळसा, डिझेल, पेट्रोल यामुळे दोन तृत्यांश सल्फर डायऑक्साइड तयार होतो. पेट्रोरसायने, तेलशुध्दीकरणाचे कारखाने, कागद कारखाने, साखर कारखाने, कापड गिरणी, रबर कारखाने यामुळे एकपंचमाश इतके हवा प्रदूषण होते. हवेतील प्रदूषणाचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच वनस्पती आणि इतर जीवसृष्टीवर होतो. हवा वेगवेगळया वायूंच्या मिश्रणाने बनली आहे. त्याचे प्रमाण सर्वसाधारण परिस्थितीत कायम असते. यापैकी काही घटक आपल्याला आवश्यक असतात, काही निरूपयोगी असतात तर काही घातक असतात. आवश्यक घटकांचे प्रमाण जास्त व अनावश्यक घटकांचे प्रमाण कमी राहून त्या दोहोत नैसर्गिक समतोल राखला गेलेला असतो. श्‍वसन क्रियेतून कार्बनडायऑक्साईड वायू बाहेर पडतो तसेच रात्रीच्या वेळी वनस्पती कार्बनडायऑक्साईड उत्सर्जीत करतात. दिवसा वनस्पती प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया करतात, यावेळी हवेतील कार्बनवायू शोषूण घेतात व प्राणवायू सोडतात. अशा प्रकारे नैसर्गिक रीतीने हवेतील घटकांचे प्रमाण कायम राखले जाते. मात्र मानवी जीवन वेगाने बदलत असून, शाश्‍वत विकास सोडून, नैसर्गिक उत्पादनांचा कास सोडून कृत्रिम उत्पादनांकडून आपण विकासाची संकल्पना मांडत आहे. त्यामुळे, प्रदूषणांची पातळी सातत्याने वाढत चालली आहे. जगातील सर्वाधिक वीस प्रदूषित शहरांत दिल्ली, मुंबई आणि वाराणसी या शहरांचाही समावेश आहे. या शहरात प्रदूषणाची पातळी ही दिवसेंदिवस खालावत चालली आहे. प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई ही चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईतलं प्रदूषण हे बिंजिंगपेक्षाही अधिक आहे अशी धक्कादायक माहिती यातून समोर आली आहे. दिल्ली, मुंबई पाठोपाठ कानपूर, फरिदाबाद, गया, पाटणा, आग्रा, मुझ्झफरपूर, श्रीनगर, जयपुर, जोधपुर यासारख्या शहरात प्रदूषणाची पातळी सर्वाधिक आहेत. भारताबरोबरच कुवेत, चीन, मंगोलिया या देशातील शहरांचाही समावेश आहे. भारतामध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास 24 लाख अकाली मृत्यू हे केवळ प्रदूषणामुळे झाले असल्याचीही बाब यात अधोरेखित करण्यात आली आहे. हवेत असलेल्या सल्फेट, नायट्रेट , कार्बन यासारख्या घटकांमुळे आरोग्यास मोठ्या प्रमाणात धोका पोहोचत आहे. या संघटनेच्या अहवालानुसार 10 पैकी 9 जण हे सर्वाधिक प्रदूषकं असलेल्या हवेत श्‍वास घेत आहेत, हे चिंताजनक असून, प्रदूषणाला लगाम लावण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकांनी सज्ज झाले पाहिजे. अन्यथा प्रदुषणाचा हा राक्षस मानवी संस्कृती गिळल्याशिवाय राहणार नाही.