राईनपाडा हत्याकांडाची एसआयटीकडून चौकशी करा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मागणी

मुंबई : राईनपाडातील घटनेची पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमून चौकशी करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राज्यात अशा प्रकारच्या 30 घटना घडल्या. तरीही या गरिबांबद्दल आवाज उठला नाही. प्राण्यांपेक्षा क्रूरपणे माणूस मारला जात आहे, ज्यांनी या लोकांना मारले त्यांची डोकी भडकवण्याचे काम काही जातीपातीचे राजकारण करणारे लोक करत आहेत. पाच जणांना ठेचून मारल्यानंतरही सरकार लवकर जागे झाले नाही, असेही मुंडे म्हणाले.
अन्यायग्रस्त कुटुंबांना 25 लाखांची मदत जाहीर करावी, कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारने नोकरी द्यावी, त्याचे सरकारने पुनर्वसन करावे, भटक्या विमुक्त समाजातील जाती- जमातींच्या विकासासाठी, त्यांना सामाजिक सन्मान मिळवून देण्यासाठी नवीन वेगळ्या योजना आणाव्यात, राज्यात सोशल मीडियावर अफवा पसरवणार्‍यांवर पायबंद घालण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या मुंडे यांनी यावेळी केल्या. राज्यातील सर्व भटक्या विमुक्त जातीची जनगणना करा, रेणके समितीच्या अहवालावर मास्टर प्लॅन तयार करा. या सर्व समाजाला ओळख पत्र देण्यात यावेत, समाजाला संरक्षण देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे कपिल  पाटील म्हणाले. अफवा पसवणारा आणि त्यावर विश्‍वास ठेवून पाच जणांना ठेचून मारणारा समाज आहे, हे या पुरोगामी राज्याचे दुर्दैव आहे. राज्यात 14 टक्के हा समाज आहे. या समाजाला सुरक्षित जगण्याची हमी सरकारने द्यावी यासाठी एससी, एसटीच्या सुरक्षेसाठी जसा कायदा आहे तसा एक नवीन कायदा राज्य सरकारने करावा, अशी मागणी रामहरी रुपनवर यांनी केली.