नाणार’वरून विधानसभेत गदारोळ राजदंड पळवण्याचा प्रयत्न ; विधानसभेचे कामकाज तहकूब

नागपूर : विधानसभेत नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून बुधवारी शिवसेेनेच्या आमदारांनी गोंधळ घातला. नाणार प्रकल्प रद्द् करण्याच्या घोषणा शिवसेनेचे आमदार देत असतांनाच, नितेश राणे यांनी थेट राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. राणे राजदंड पळवण्याच्या प्रयत्नात असतांनाच, शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनीदेखील राजदंड पळविण्यासाठी राणे यांच्यासोबत झटापट केल्याचे पहायला मिळाले. राणे आणि साळवी यांच्यातील झटापट पाहून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि वैभव नाईक यांनीही राजदंड पळवण्यासाठी झटापट सुरू केली. हा सर्व प्रकार पाहून अध्यक्षांच्या 3 चोपदारांनी हा राजदंड मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि तिन्ही  आमदारांना बाजूला सारत राजदंड ताब्यात घेतला. सभागृहातील हा गोंधळ पाहता, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेचे कामकाज दिवसभारसाठी तहकूब केले.
या प्रकरणी शिवसेनेचे आमदार राजन साळवी म्हणाले, की नाणारहुन नागपूरला आलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाची माहिती सभागृहाला देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र, आम्हाला सभागृहात बोलू दिले नाही. त्यामुळे शिवसेनेची आक्रमकता दाखवण्यासाठीच आम्ही थेट राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला आहे. आता याबाबत सरकारसोबत कोणतीही चर्चा नको, तर फक्त नाणार रद्द केला, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी ही साळवी यांनी यावेळी केली. तसेच प्लास्टिक बंदी करतानादेखील शिवसेना सत्तेत होती आणि नाणार रद्द करण्यासाठी सत्तेत राहून ते गोंधळ घाललात ही शिवसेनेची ढोंगबाजी असल्याचा आरोप ही राणे यांनी केला. 
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत ठेकेदार कंपनीकडून दिरंगाई केली जात आहे. ठेकेदाराने पावसाळ्यात पर्यायी व्यवस्था न के ल्याने महामार्ग दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला असून वाहनांचे अपघात घडत आहेत. ठेकेदाराच्या या निष्ष्काळजीपणाचा शिवसेना आमदारांनी निषेध केला आहे. मुंबई-गोवा भरावाची माती महामार्गावर येऊन महामार्ग चिखलमय व निसरडा बनल्याने वाहतुकीस असुरक्षित बनला आहे. ठेकेदारकडून तात्पुरती मलमपट्टी वगळता कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. ठेकेदाराच्या या निष्काळजी पणामुळे वारंवार या मार्गावर अपघात घडत आहेत. लोकांच्या जीवाशी खेळणार्‍या या ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना आमदारांनी विधान भवनात आक्रमक भूमिका घेतली असून आंदोलन करून निदर्शने नोंदविली. ठेकेदारावर क ारवाई झालीच पाहिजे अशा घोषणा देऊन आमदारांनी विधान भवनाचा परिसर दणाणून सोडला.
चौकट..........
कोणत्याही आंदोलनासाठी तयार : राणे 
कोकणातल्या जनतेने आम्हाला मोठे केले आहे. त्या कोकणी लोकांसाठी राजदंड काय पण कोणतेही आंदोलन करण्यासाठी तयार आहोत. सरकारच्या विरोधात राग व्यक्त करण्यासाठी मी पहिल्यांदा राजदंड पळवला. ते पाहून शिवसेनेचे आमदार धावत आले. सत्तेत असताना ही शिवसेनेला आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी राजदंड पळवण्याचा प्रयत्न करावा लागतो, यावरून सत्तेत त्यांची लायकी काय आहे हे दिसते, अशी टीकाही राणे यांनी केली.