Breaking News

सईदची लाहोरमध्ये ट्रम्पविरोधात रॅली

लाहोर : नजरकैदेतून मुक्त झालेला मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदने शुक्रवारी लाहोरमधून काढण्यात आलेल्या एका रॅलीचे नेतृत्व केले. जेरूसेलमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेच्या विरोधात देशव्यापी मोहीम छेडण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 


मुस्लिम राष्ट्रांनी जेरुसेलममध्ये आपला दूतावास सुरू करू नये, यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण समितीने आपले शिष्टमंडळ या राष्ट्रांमध्ये पाठवून त्यांना यासाठी राजी करावे, असे सईद या वेळी म्हणाला. मुस्लिम राष्ट्रांना अमेरिकेविरोधात एकत्र येण्याचेही आवाहन त्याने या वेळी केले. अमेरिकेकडून १ कोटी डॉलर्सचे इनाम असलेल्या हाफीज सईदची गत २४ नोव्हेंबर रोजी पाक सरकारने नजरकैदेतून सुटका केली होती.