Breaking News

पीक विम्याची रक्कम किमान पाचशे रुपये - सदाभाऊ खोत


नागपूर : शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम किमान पाचशे रुपये देण्याबाबत विमा कंपन्यांना निर्देश देण्यात येतील, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधानसभेत सांगितले.

राज्याच्या विविध भागात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही एक रुपये मिळाल्याचे प्रकार घडले असल्याचा मुद्दा सदस्यांनी 293 अन्वये प्रस्तावावरील चर्चेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. खोत बोलत होते. श्री. खोत म्हणाले, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गंत गेल्या चार वर्षात राज्यात 11 हजार263 कोटींचा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. यापुढील काळात 11हजार 900 कोटी रुपयांच्या पीक विम्याची रक्क्म शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच गेल्या वर्षी कापसावरील बोंडअळी, धान्यावरील मावा-तुडतुड्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारणाकडून 3हजार 400 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. मात्र केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने तीन टप्प्यात मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत एक हजार नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री अजित पवार, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, एकनाथ खडसे आदी सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.