नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रात होणाऱ्या पुतळ्याच्या उंची वरून भाजप, काँग्रेस आमने-सामने उभे ठाकले आहेत. विधानभवनामध्ये या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रस्तावित पुतळ्याची उंची कमी करण्यावरुन विधानसभेत गदारोळ झाला. शिवरायांच्या पुतळ्याची उंची 7 फूट कमी करण्यात आली याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. पण अतुल भातखळकर यांनी या मुद्द्याला हरकत घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर दिलं. सभागृहाचं कामकाज बाजूला ठेवून या मुद्यावर चर्चा करा, 15 वर्षात काय केलं ? असे प्रश्न उपस्थित करून या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात गोंधळ सुरु केला. 15 वर्षांत महाराजांचा पुतळा का नाही केला, मी सर्व परवानग्या आणल्या, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. या गदारोळातच काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजदंड पळवून नेला.