समाज विकासात देशमुख कुटूंबियांचे मोठे योगदान : आ. थोरात
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे ज्येष्ठ कार्यकर्ते भैय्यासाहेब देशमुख आणि कर्तव्यदक्ष अधिकारी बी. जे. देशमुख यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. चंद्रशेखर कदम होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, माजी आ. दिलीप ढमढेरे, रणजितसिंह देशमुख, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, अॅड. माधवराव कानवडे, रामदास वाघ, अजय फटांगरे, निशा कोकणे, पोपट ओसवल, लिज्जत पापड समुहाचे सुरेश कोते, गणपत सांगळे, सदाशिव वाकचौरे, अशोक देशमुख, अमित पंडीत, शरयू देशमुख, साहेबराव गडाख, लक्ष्मण कुटे, राजेंद्र शेंडगे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले, सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी जिल्हा बँक व महाराष्ट्र बॅकेच्या माध्यमातून तालुक्यात पाईपलाईन योजना राबविली. त्यामुळे येथील जनजीवन फुलले. सहकार वाढला. सहकारामुळे गावातील कुटूंबामध्ये समृद्धता आली. देशमुख कुटूंबियांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. भैय्यासाहेब देशमुख यांच्या पिढीचे यश म्हणजे सध्याची कर्तृत्ववान पिढी. बी. जे. देशमुख हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहे. चांगले राज्य हे चांगल्या अधिकार्यावर अवलंबून असते. संस्था चालविण्यासाठीही चांगल्या अधिकार्यांची गरज असते. बी. जे. देशमुख यांनी सामान्य माणूस डोळयासमोर ठेवून काम केले. त्यांना खर्या अर्थाने कामाचा आनंद मिळत आहे.
माजी आ. चंद्रशेखर कदम म्हणाले, आ. बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व संगमनेर तालुका व जिल्ह्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. प्रामाणिक व पारदर्शक नेतृत्वामुळे तालुक्याचा मोठा विकास झाला आहे. बी. जे. देशमुख यांच्या सारख्या प्रामाणिक अधिकार्याची राज्याला मोठी गरज आहे. बी. जे. देशमुख म्हणाले, संगमनेर ही सहकाराची पंढरी आहे. आदर्श नेतृत्व म्हणजे आ. बाळासाहेब थोरात. सर्व सामान्यांच्या विकासासाठी ते काम करीत आहेत. येथील सहकार हा राज्याला दिशा देणारा आहे. आ. थोरात यांच्या नेतृत्वाची आता राज्याला गरज असून संगमनेरकरांना हे नेतृत्व जपले पाहिजे.