वडाळा-चेंबूर स्थानकात मोनोरेल अडकली

मुंबई, दि. 01 - मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चार तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळे मोनो प्रवाशांना सोमवारी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. सोमवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास वडाळयामध्ये भक्तीपार्कजवळ मोनोरेल अचानक बंद पडली.
वडाळा-चेंबूर दरम्यान सकाळी साडेसहा पासून मोनोरेलची वाहतूक बंद होती. अडकलेल्या मोनोरेलला बाहेर काढण्यासाठी दुसरी मोनोरेल पाठवण्यात आल्याने वाहतूक बंद झाली होती.
सुदैवाने ड्रायव्हर वगळता एकही प्रवासी या गाडीमध्ये नव्हता. ड्रायव्हरला क्रेनच्या सहाय्याने खाली उतरवण्यात आले.
चार तासांच्या प्रयत्नानंतर बिघाड दूर करण्यात मोनोच्या तंत्रज्ञानाना यश आले आहे. अखेर अडकलेली मोनोरेल वडाळ्याच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे.
वारंवार होणा-या बिघाडामुळे मुंबईची लोकलसेवा सातत्याने कोलमडत असताना आता यामध्ये मोनोरेलचाही भर पडली.