Breaking News

मराठा आरक्षणाची हायकोर्टातील सुनावणी 29 मार्चपर्यंत तहकूब

मुंबई, दि. 28 - मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी 29 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 27  फेब्रुवारी पासून मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणावर नियमित सुनावणी सुरु झाली. मात्र पहिल्याच सुनावणीदरम्यान पुढील सुनावणी एका महिन्यासाठी तहकूब करण्यात आली आहे.
गेली 5 वर्ष रिक्त असलेली मागासवर्गीय जमातीसाठीची समिती 4 जानेवारी 2017 ला राज्य सरकारकडून नव्यानं स्थापन करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा या समितीपुढे मांडायचा की नाही? यावर पुढील सुनावणीला याचिकाकर्ते आणि राज्य सरकार आपली भुमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे ही सुनावणी 29 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढले जात आहेत. याच पार्श्‍वभूमीवर विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टानं लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाला दिले होते. त्यामुळे  27 फेब्रुवारीपासून याची दैनंदिन सुनावणी हायकोर्टात सुरु झाली. न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी होणार आहे.