Breaking News

नागपुरात अवकाळी पाऊस, पारा 4 अंशाने घसरला

नागपूर, दि. 10 एप्रिल -  मध्य भारतातील उष्ण शहर म्हणून ओळखल्या जाणा-या नागपुरात आज,मंगळवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे. गेल्या 24 तासात नागपुरात 6 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. 
राज्यातील उष्ण हवामानाचा भाग म्हणून ओळखल्या जाणा-या विदर्भात गेल्या 7 एप्रिलपासून तुरळक पण सातत्याने पडणा-या अवकाळी पावसामुळे पारा 40 अंशाच्या खाली गेला आहे. विदर्भात ऊन-पावसाचा लपंडाव सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून नागपूरात वादळ वार्‍यासह पाऊस पडतो आहे. त्यामुळे तापमान स्थिर असून हवेत काहिसा गारवा निर्माण झाला आहे. एरवी या दिवसात पारा 42 ते 43 अंशापर्यंत पोहोचतो. पण पावसामुळे तापमानात अपेक्षित वाढ झाली नसल्याने नागपूरकरांना उन्हाच्या झळांपासून काहीसा दिलासा मिळत आहे. अचानक ऊन वाढल्याने आणि बंगालच्या उपसागरावरून आर्द्रतायुक्त वार्‍यामुळे सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. सकाळी आणि दुपारी कडक ऊन असते. त्यानंतर सायंकाळी अचानक ढग दाटुन येतात आणि वादळी वार्‍यासह पाऊस पडतो. नागपुरात आज,मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप रात्री 10 वाजेपर्यंत तशीच सुरू होती. पुढील दोन दिवस हिच परिस्थिती कायम राहणार आहे, अशी माहिती नागपूर हवामान विभागानं दिली आहे. गेल्या 24 तासात विदर्भात सर्वाधिक तापमान अकोला येथे 41.4 अंश इतके नोंदवण्यात आले. त्याखालोखाल प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेल्या चंद्रपूर येथे 40.2 अंश तापनाची नोंद करण्यात आली. तर अमरावती येथे 38.2 अंश गडचिरोली येथे 38.4 अंश गोंदियामध्ये 38.5 अंश नागपुरात 38.4 अंश, वर्धा येथे 38.8 अंश, वाशिममध्ये 39 अंश आणि यवतमाळ येथे 39.5 अंश कमाल तापमान नोंदवण्यात आले. आगामी दोन दिवस विदर्भात पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. त्यामुळे वाढत्या उकाड्यापासून आणखी दोन दिवस नागपूरसह विदर्भातील नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे.