Breaking News

महात्मा फुले यांना अभिवादन करतांना...

स्त्री, शूद्र आणि शेतकर्‍यांची दयनिय अवस्था कशी आणि का झाली, याचा ऐतिहासिक शोध घेत, 19व् या शतकात क्रांतीज्योती महात्मा फुले यांनी प्रथमच या सर्व शोषणाचे कारण शेटजी आणि भटजी हेच असल्याचे निक्षून सांगितले. शेतकरी आपल्या शेतीत प्रचंड काबाडकष्ट करुनही त्याला पोटालाही पुरेस अन्न मिळत नव्हते. त्या काळातील स्थितीवर महात्मा फुले यांनी शेतकर्‍यांच्या ‘आसुड’ मधुन विश्‍लेषण केले. सगळ्या विश्‍लेषणानंतर ‘अविद्या’ हे एकमेव कारण आहे. त्यासाठी स्त्री, शूद्र आणि शेतकर्‍यांना शिक्षित केले पाहिजे या विचारांनी महात्मा फुले यांच्या मनाचा ठाव घेतला. शिक्षणाची पारंपारिक मक्तेदारी धर्मसत्तेच्या माध्यमातून ब्राह्मणांनी आपल्याकडे ठेवली होती. त्यामुळे स्त्री, शूद्रांना शिक्षण नाकारण्यात आले होते. ‘स्त्री-शूद्राय न मति दद्याय’ या मनुस्मृतीच्या वचनाप्रमाणे ब्राह्मणी व्यवस्थेने कायदा अंमलात आणला होता. या शोषित-पीडित समुदायाला अविद्येपासून मुक्त करण्यासाठी महात्मा फुले यांनी या देशात कृतिशील लढा उभा केला. स्त्रीयांसाठी पहिली शाळा, अस्पृश्यांसाठी शाळा त्यांनी स्वतंत्रपणे सुरु केल्या. त्याचबरोबर भारतात आलेल्या हंटर कमिशन समोर त्यांनी शिक्षणाच्या सार्वत्रिक अधिकाराचा मुद्दा मांडला. हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनात महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याची मागणी केली. आज शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाल्याचा केवळ भास होत आहे. कारण महात्मा फुले यांनी केलेल्या मागणीनुसार शिक्षण सर्वांसाठी खुले झाले. यातून बहुजन समाज शिकू लागला. शिक्षण घेवून तो विचार करु लागला. त्यामुळे या देशाच्या इतिहासाचे त्याने आकलन केले. म्हणून तो बहुजन समाज आज आपल्या उत्थानाचा विचार मांडू शकतो. शिक्षित झाल्याशिवाय माणसाला विचार करता येत नाही. सारासार विचारांची शक्ती हे प्रत्येक समस्येचे विश्‍लेषण करु शकते. महात्मा फुले यांनी भारतातील स्त्री-शूद्र समाजाला दिलेली ही सर्वात मोठी देणगी आहे. त्यांचा अविद्येचा प्रश्‍न हा शिक्षणाशी जसा निगडीत आहे तसा तो प्रत्येक क्षेत्रातील अविद्या नष्ट करण्याशीही जुळलेला आहे. महात्ता फुले यांच्या काळात आजच्यासारखी स्वातंत्र्याची परिस्थिती नव्हती. त्यामुळे शिक्षित झालेल्या शूद्रांना आजच्या स्वातंत्र्यामध्ये आपल्या सर्व अधिकारांसाठी सजग राहीले पाहिजे. बहुजन समाजाला राजकीय सत्तेपासून बाहेर ठेवले जात आहे. राजकीय शिक्षणाचा अभाव असल्याचाही हा दुष्परिणाम आहे. राजकारण हे केवळ सत्तासंपत्ती कमविण्यासाठी नसून पिडीत असलेल्या जनतेचे प्रश्‍न सोडवून त्यांना सशक्त करण्यासाठीही आहे. आजचे शोषण हे केवळ आर्थिकच आहे असे नव्हे, तर या शोषणाला अधिक मजबूत करुन देणारी राजकीय शक्ती आज अस्तित्वात आहे. ही परिस्थिती बदलवणे लोकशाही अधिकारानुसार या जनतेवर अवलंबून आहे. मात्र या जनतेला राजकीय शिक्षित होण्यापासून आजही वंचित ठेवले गेले आहे. ही परिस्थिती ओळखून बहुजन समाजाने महात्मा फुले यांचे ऐतिहासिक विश्‍लेषण लक्षात घेतले पाहिजे. या विश्‍लेषणानुसार आपले उध्दारकर्ते आपणा स्वत:लाच व्हावे लागेल. यासाठी लोकशाही व्यवस्थेत जे अधिकार मिळाले आहेत, त्या अधिकारांची जाणीव ठेवली गेली पाहिजे. लोकशाही व्यवस्थेत मिळालेले अधिकार या देशात कोणतीही रक्तरंजीत क्रांतीची किंमत न चुकविता मिळाले आहे. त्यामुळे याचे महत्त्व जराही कमी होवू देता कामा नये. आज देशात आणि राज्यात
राजकारणासाठी ज्या छत्रपति शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते, त्याच छत्रपति शिवाजी महाराजांची बहुजन कुळवाडी भूषण म्हणून पहिली ओळख देशाला महात्मा फुले यांनीच घडवून दिली. शिवाजी महाराजांच्या संदर्भातील आणि अनेक ऐतिहासिक स्थळे व समाधी त्यांनी अत्यंत कठोर परिश्रमांनी शोधून काढली. शिवाजी महराजांचा खरा इतिहास हा बहुजनांच्या हिताचा असल्याचा निर्वाळा महात्मा फुले यांनीच प्रथम दिला. महात्मा फुले यांनी छत्रपति शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या दीर्घ पोवाड्यात छत्रपति शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट उभा केला आहे. आणि हा जीवनपट गोब्राह्मण प्रतिपालक नसून, कुळवाडी भूषण बहुजन राजा अशा आशयाचा आहे. अशा ऐतिहासिक वास्तवाला आमच्या समोर मांडणार्‍या महात्मा जोतीबा फुले यांना कोटी कोटी प्रणाम...