दारुच्या नशेत पोलिसावर हल्ला; दोघे अटकेत

विरार, दि. 13, नोव्हेंबर - रस्त्यावर दारु पिणा-या दारुड्यांना हटकल्यामुळे दोन दारुड्यांनी पोलिसांना धक्काबुकी करुन, त्यांच्या हाताचा चावा घेतल्याचा प्रकार विरारमध्ये घडला आहे. या प्रकरणात कर्तव्य बजावत असणार्‍या पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात दोन आरोपीला अटक करण्यात आले आहे.


सतिश सुधाकर उंडे आणि योगेश हरिचंद्र लोखंडे अशी मारहाण करणार्‍या दारुड्यांची नावे आहेत. सतिश हा मालाडला राहतो, तर योगेश हा नालासोपार्‍यात राहतो.माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई धनाजी घोरपडे विरार येथील बंदोबस्त संपवून वसईला जात होते. 

त्याचवेळी विरार पूर्व मनवेलपाडा परिसरातील मोहक सिटीच्या पाठीमागील रोडवर अंधारात एका चारचाकीच्या पाठीमागे दोन्ही आरोपी दारु पित बसल्याचे घोरपडे यांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी हटकले आणि पोलिस ठाण्यास येण्यास सांगितले, तर दारुच्या नशेत असणार्‍या सतिश ऊंडे या आरोपीने पोलिसांच्या चेह-यावर नखाने ओरखोडून डाव्या हाताच्या बोटाला चावाही घेतला आणि जबर दुखापत केली.