इपिलेप्सी आजाराच्या निदान व उपचारासाठी शिबीर संपन्न

सांगली, दि. 18, नोव्हेंबर - फिट्स येणे (अपस्मार / इपिलेप्सी) या आजाराच्या निदान व उपचारासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात शिबीर आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या सक्रिय सहभागातून हे शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले.


या शिबिरामध्ये मुंबईचे सुप्रसिध्द न्युरॉलोजीस्ट डॉ. निर्मल सुर्या व जे. जे. हॉस्पिटलचे न्युरॉलॉजीस्ट डॉ. पलांडे यांच्या 40 जणांच्या चमूने एकूण 981 रूग्णांची तपासणी केली. 443 अपस्माराचे रूग्ण आढळून आले. 83 रूग्णांचे मेंदूचे आलेख (ईसीजी) काढले गेले. सर्व रूग्णांना 3 महिन्यांचे औषध मोफत देण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाची जिल्ह्यातील 32 पथके गेले महिनाभर यासाठी सर्व जिल्हाभर कार्यरत होती. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने सिव्हील सर्जन डॉ. सोनटक्के व अतिरिक्त सिव्हील सर्जन डॉ. संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर यशस्वी केले.