चार राज्यांत विधानसभेच्या ५ जागांसाठी २१ डिसेंबरला पोटनिवडणूक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशच्या पाक्के कसांग व लीकाबली (राखीव), तामिळनाडूच्या राधाकृष्णनगर, उत्तर प्रदेशच्या सकंदरा व पश्चिम बंगालच्या सबांग विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.
येत्या २७ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी होणार असून, सोबतच उमेदवारी अर्जसुद्धा भरले जाणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ४ डिसेंबर असणार आहे. त्याच्या एक दिवसानंतर अर्ज पडताळणी होईल व ७ डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या सर्व जागांवर २१ डिसेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
२४ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. वरील सर्व जागांवर व्हीव्हीपॅट युक्त ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्यात येणार आहे. सर्व निवडणूक प्रक्रिया २६ डिसेंबरपूर्वी पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. उल्लेखनीय बाब अशी की, तामिळनाडूच्या आर. के. नगर मतदारसंघाचे नेतृत्व दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी अनेक वर्षे केले आहे.
गतवर्षी त्यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी गेल्या एप्रिल महिन्यात पोटनिवडणूक होऊ घातली होती. परंतु येथे मोठ्या प्रमाणावर पैसा व अवैध प्रकार घडल्याने निवडणूक रद्द करण्यात आली होती.
Post Comment