दहावी नापास मुलाची पोलीस अधिक्षक पदापर्यंत झेप

सिंधुदुर्गनगरी, दि. 25, नोव्हेंबर - दहावी बारावीत नापास होणारा सिंधुदुर्गातला मुलगा जम्मू काश्मीर सारख्या राज्याचा वरिष्ठ पोलीस अधीक्षक झाला आहे. ही अशक्य वाटणारी गोष्ट सावंतवाडीच्या राजीव पांडे या तरुणाने शक्य करुन दाखविली आहे. त्याच्या याच जिद्दीचा प्रवास पत्रकार शेखर सामंत यांनी उलगडून दाखवला. निमित्त होत राजीव पांडे यांच्या ’ध्येय उत्तुंग भरारीचे’ या खास मुलाखत कार्यक्रमांचे. कुडाळच्या बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेत झालेल्या या कार्यक्रमाने अनेकांनी निश्‍चितच प्रेरणा घेतली.


बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्गच्या वतीने ’ध्येय उत्तुंग भरारीचे’ या विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयपीएस अधिकारी बनलेले आणि धगधगत्या काश्मीरमध्ये वरिष्ठ सुप्रिडेन्डन्ट ऑफ पोलीस ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणारे सिंधुदुर्गचे सुपुत्र राजीव पांडे हे सुट्टीनिमित्त सिंधुदुर्गात आले आहेत. जम्मू-काश्मीरख्या सदैव आतंकवादी हल्ले होत असणार्‍या खोर्‍यात ते पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. आजच्या ज्या तरुण पिढीला आय.पी.एस. ऑफिसर व्हायचे असेल त्यांना एक उत्तम मार्गदर्शन मिळावे यासाठी राजीव पांडे यांच्या खास मुलाखतीच आयोजन करण्यात आल होत. 

ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांनी ही मुलाखत घेतली. राजीव पांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलीस अधिक्षक राजीव पांडे, त्यांचे वडील डॉ. ओम प्रकाश पांडे, डॉ. दिपाली काजरेकर आणि मुलाखतकार शेखर सामंत इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राजीव पांडे आणि इतर सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.


दहावी-बारावीच्या परीक्षेत अपयश येऊनही जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत यश मिळविणार्‍या राजीव पांडे यांच्याकडून आजच्या तरुण पिढीला उत्तेजन मिळावे, त्यांच्या मनात जे काही प्रश्‍न आहेत त्यांची उत्तरे त्यांना मिळावीत यासाठीच या मुलाखतीच प्रयोजन होत. या संधीचा अनेक मुलांनी चांगला फायदा घेतला. उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील आपल्या मनातील प्रश्‍न त्यांना विचारले. राजीव पांडे यांनी देखील कोणताही आडपडदा न ठेवता अगदी आपल्या दहावी बारावीतल्या अपयशापासून ते आत्ताच्या यशापर्यंतचा आलेख उलगडून दाखवला.