Breaking News

दुष्काळग्रस्त कर्नाटक, पुद्दुचेरीला व अरूणाचल प्रदेश केंद्र सरकारची 842 कोटींची मदत

नवी दिल्ली, दि. 24 -  कर्नाटक, पुद्दुचेरी आणि अरुणाचल प्रदेश या तिन्ही राज्यांना केंद्र सरकारने 842.7 कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर केला. या राज्यांतील काही भाग पुराच्या तडाख्यात सापडलेला आहे, तर काही भाग भीषण दुष्काळात होरपळत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही मदत करण्यात आली आहे.

दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्राशेजारील कर्नाटक राज्याला 723.23 कोटी रुपये, पुराच्या तडाख्यात सापडलेल्या पुड्डुचेरीला 35.14 कोटी आणि अरुणाचल प्रदेशसाठी 84.33 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या माध्यमातून दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या कर्नाटक आणि पुराचा तडाखा बसलेल्या पुड्डुचेरीला आर्थिक आधार मिळणार आहे. भीषण दुष्काळामुळे कर्नाटकात प्रचंड हानी झाली आहे, तर पुड्डुचेरीला पुराचा तडाखा बसल्याने बरेच नुकसान झाले आहे. त्यामुळे या राज्यांना मदत करणे गरजेचे होते. या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती नेमली होती. या समितीने यासंबंधीचा अभ्यास करून केंद्र सरकारला अहवाल दिला. त्यानंतर केंद्र सरकारने आज ही मदत जाहीर केली. त्यामुळे काही अंशी का होईना दुष्काळग्रस्त कर्नाटक आणि पूरग्रस्त पुड्डुचेरी, अरुणाचल प्रदेशला दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय गृहममंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. या बैठकीत राज्यांना आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग, गृहसचिव राजीव महर्षि आणि गृह, अर्थ आणि कृषि मंत्रालयाचे सचिव उपस्थित होते. अरुणाचल प्रदेशला दिलेली 84.33 कोटी रुपयांची मदत केंद्रीय सहायतामधील 18 कोटी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत दिले गेले. महाराष्ट्र, कर्नाटकासह 10 राज्यांनी आपापल्या राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी 10 हजार कोटींपेक्षा अधिक आर्थिक मदत केंद्राने दिली आहे. पुड्डुचेरीला डिसेंबर 2015 मध्ये पावसाचा जबर तडाखा बसला. त्यावेळी आलेल्या पुरात बरीच हानी झाली आहे. अरुणाचल प्रदेशालाही गतवर्षी पुराचा तडाखा बसला होता.