चंद्र-तारा असलेल्या हिरव्या झेंड्यावर बंदी? सर्वोच्च न्यायालयाने मागितले मोदी सरकारला उत्तर
नवी दिल्ली - चंद्र-तार्याचे चिन्ह असलेल्या हिरव्या रंगाच्या झेंड्यावर बंदी आणण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त महाधिवक्ता (एएसजी) तुषार मेहता यांना या प्रकरणी केंद्राच्या सूचना मागवून न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी ही याचिका दाखल केली. चंद्र-तार्याचे चिन्ह असलेला हिरवा झेंडा पाकिस्तान व मुस्लीम लीगशी मिळता-जुळता आहे. मुस्लीम भागात हा झेंडा फडकवणे गैरसमज व सांप्रदायिक तणाव निर्माण होण्याचे कारण ठरूशकते, असे रिझवी यांचे मत आहे. देशभरात अशा प्रकारचे झेंडे फडकवण्यास बंदी आणण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आपल्या याचिकेद्वारे केली आहे. याचिकेत सांगितल्याप्रमाणे या झेंड्याचा इस्लामशी काहीही संबंध नाही. याचिकेत झेंड्याचा इतिहास सांगताना म्हटले आहे, की मोहम्मद पैगंबरांनी आपल्या काळात पांढर्या किंवा काळ्या झेंड्यांचा वापर केला होता. रिझवी यांनी असेही नमूद केले, की चंद्र-तारा असलेल्या या हिरव्या झेंड्याचा उगम 1906मध्ये नवाब बक्र-उल-मलिक व मोहम्मद अली जिन्ना यांच्यामार्फत झाला.