Breaking News

नेरला उपसा सिंचन व उजव्या कालव्याचे उपराष्ट्रपतींच्या केले ई-जलपूजन

नागपूर, दि. 11, नोव्हेंबर - गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाअंतर्गत नेरला उपसा सिंचन योजना तसेच गोसीखुर्दच्या 99 कि.मी. लांबीच्या उजवा कालवा व आसोला मेंढा मुख्य कालव्याचे ई-जलपूजन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज, शुक्रवारी नागपुरात झाले. रेशीमबाग मैदानावर आयोजित ग्रोव्हिजन प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त गोसीखुर्द या राष्ट्रीय प्रकल्पाअंतर्गत असणार्‍या महत्वाकांक्षी योजनेचे ई-जलपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, उपस्थित होते.
गोसीखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले असून येत्या 2019 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी उपलब्ध करुन दिला आहे. हा प्रकल्प नागपूर, चंद्रपूर व भंडारा या जिल्ह्यातील शेतीला सिंचनाचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार असून सुमारे 2 लक्ष 50 हजार 800 हेक्टर क्षेत्रात सिंचनाच्या सुविधा निर्माण होणार आहेत. नेरला उपसा सिंचन योजनेद्वारे 28 हजार 680 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असून ही योजना कार्यान्वित झाली आहे. खरीप हंगामामध्ये 4 हजार 232 हेक्टर क्षेत्राला अतिरिक्त सिंचन कालव्यावर पंपाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे. तसेच 24 हजार 814 हेक्टर सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे. या योजनेवर 377 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
गोसीखुर्द उजवा कालवा व आसोला मेंढा मुख्य कालव्यामधून थेट शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. एकूण 99 कि.मी. लांबीच्या या कालव्याद्वारे 71 हजार 810 हे. सिंचन क्षमता प्रस्तावित असून 13 हजार 926 हे. सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. आसोला मेंढा मुख्य कालव्याच्या अखेर प्रर्यंत 43 कि.मी. लांबी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे खरीप हंगांमात 21 हजार 5110 हे. क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळाला आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गोसीखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने शेती व सिंचनाला प्राधान्य दिले असल्यामुळे शेतकर्‍यांच्या जिवनात बदल घडणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.