Breaking News

मन्यारखेडे ‘मन्यार दूध’ या नावाने प्रसिध्द होईल - राज्यमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. 24, सप्टेंबर - मन्यारखेडे या गावाचा मुळ व्यवसाय दुध उत्पादन हा असून या गावात लग्न न झालेली व्यक्ती सापडेल पण पशुधन (म्हैस) नसलेले  कुटूंब शोधूनही सापडणार नाही. मन्यारखेडे हे गाव जिल्हयात दूध उत्पादनात अग्रेसर गाव असल्याने हे गाव ‘मन्यार दूध’ या नावाने प्रसिध्द होईल. असा आशावाद  सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानातंर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुका कृषि कार्यालयाच्यावतीने मन्यारखेडे येथे पशुधन वाटप सहकार राज्यमंत्री  गुलाबराव पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
मन्यारखेडे या गावात कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने या कार्यक्रमासाठी गावाची निवड करण्यात आली आहे. येथील गावकरी कष्टाळू असून गावकर्‍यांना पशुपालन व  दूध उत्पादनाचे व्यसन आहे. गावाचा शाश्‍वत विकास होण्यासाठी शेतीपुरक उद्योगांना चालना देण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील 33 शेतकर्‍यांना  63 म्हशींचे वाटप करण्यात आले तर पशुधन धारकांना चारा मिळण्यासाठी दोन शेतकर्‍यांना मुरघास युनिटचे तर दोन शेतकर्‍यांना शेडनेट हाऊसचे वाटप करण्यात  आले आहे. यासाठी 19.60 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. मन्यारखेडे या गावासाठी कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमातंर्गत 46.82 लाख रुपयांची तरतुद  करण्यात आल्याची माहितीही राज्यमंत्री पाटील यांनी यावेळी दिली. मन्यारखेडे गावात दुध उत्पादनाबरोबरच दुग्धजन्य पदार्थ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी येथील  लाभार्थ्यांना आनंद (गुजरात) डेअरीच्या प्रकल्पास भेट देऊन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांसोबत मी स्वत: ही येईल असेही राज्यमंत्र्यांनी यावेळी  ग्रामस्थांना सांगितले.
मन्यारखेडे गावातील बागायती क्षेत्र कमी असल्याने या गावाची जलयुक्त शिवार अभियानात निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावाला  दुष्काळमुक्तीकडे नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, गावातील शेतकर्‍यांकडून शेतीसाठी ठिबक सिंचनाची मागणी आल्यास त्यांना  अनुदानातून ठिबक संच उपलब्ध करुन देण्यात येतील. त्याचबरोबर गावात विहिर पुर्नभरणाचा कार्यक्रमही राबविण्यात येईल. गावात दुग्धजन्य पदार्थ्यांचे उत्पादन  वाढण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून महिलांना गावातच रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणास प्राधान्य देणार  असून राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानातंर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून गावाची प्रगती होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील, रमेश पाटील, तहसीलदार अमोल निकम, नशीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक धारभाडे,  उपविभागीय कृषि अधिकारी लोखंडे, तालुका कृषि अधिकारी विजय भारंबे, सरपंच राजू पाटील, उपसरपंच नामदेव महाजन, तालुकाप्रमख नानाभाऊ सोनवणे,  जनार्दन पाटील, प्रवीण पाटील, पुंडलीक पाटील, शांताराम पाटील, दिनेश जोगदंड यांचेसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांच्यावतीने राज्यमंत्र्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर कृषि पर्यवेक्षक एम. के. वाल्हे, कृषि सहायक प्रवीण सोनवणे यांनी  उत्कृष्ट काम केल्यामुळे त्यांचा राज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस. आय. पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार सरपंच राजू पाटील यांनी मानले.