Breaking News

तळोजा-डोंबिवली-कल्याण या मेट्रो मार्गाचा अहवाल 9 महिन्यांत सादर होणार

डोंबिवली, दि. 24, सप्टेंबर - तळोजा-डोंबिवली-कल्याण या मेट्रो मार्गासाठीचा अहवाल येत्या 9 महिन्यांत सादर केला जाणार आहे. यासाठी दिल्ली मेट्रो  कॉर्पोरेशनची नियुक्ती केली आहे, असे पत्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठवले आहे.
खा. शिंदे यांनी 20 ऑक्टोबर 2016 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तळोजा-डोंबिवली-कल्याण या मार्गे मेट्रो करण्याबाबत सादरीकरण केले  होते. यामध्ये कल्याणपर्यंत येणारी मेट्रो डोंबिवली व शीळ फाटा मार्गे तळोजा येते जोडावी. जेणेकरून डोंबिवलीकरांना ठाणे व मुंबईला जाण्यासाठी रेल्वेला पर्यायी  व्यवस्था निर्माण करता येईल, असे डॉ. शिंदे यांनी सुचवले होते. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मार्गाला तत्वत: मान्यता दिली. यानंतर डॉ. शिंदे यांनी सतत  पाठपुरावा केला. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत हा मेट्रो प्रकल्प प्राधान्याने घेण्याचे आश्‍वासन फडणवीस यांनी दिले. यात दिल्ली मेट्रोची सल्लागार  म्हणून नेमणूक करण्यात आली असून येत्या 9 महिन्यांत या मार्गाचा सविस्तर अहवाल सादर केला जाणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून  सांगण्यात आले. या मार्गे मेट्रो गेल्यास लाखो नागरिकांना याचा लाभ होईल, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.