Breaking News

जळगाव जिल्हा सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा उत्साहात; बँकेला 23 कोटी रुपयांचा नफा

जळगाव, दि. 24, सप्टेंबर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा आज (दि. 22) उत्साहात झाली. बँकेच्या अध्यक्ष सौ. रोहिणी खेवलकर-खडसे  या अध्यक्षस्थानी होत्या. गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात बँकेने कमी मनुष्यबळ सेवेत असताना आणि अत्याधुनिक विविध सेवांची मुहूर्तमेढ करीत पारदर्शी व कार्यक्षम  काम केल्याबद्दाल उपस्थित सभासदांनी विशेष ठराव मांडून अध्यक्ष, संचालक मंडळ व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. अशा प्रकारचा सभासदांचा ठराव पहिल्यांदा  बँकेच्या इतिहासात झाला.
बँकेच्या व्यवस्थापनात खर्च कमी करण्यावर भर दिलेला असताना आता कमी कर्मचारी संख्येतही उत्तम प्रकारे काम पूर्ण केले आहे. जिल्हा बँकेस 31 मार्च 2017  अखेर नफा 23 कोटी 86 लाख झालेला होता. मात्र, केंद्र सरकारने नोटबंदी जाहीर केली. सभासदांकडून 1000 व 500 रुपयांच्या नोटा गोळा करण्यात आल्या.  ती रक्कम 210 कोटी रुपये झाली. मात्र, केंद्र सरकारने जिल्हा बँकेकडील रक्कम बदलून देण्यासंदर्भातील निर्णय उशीरा घेतला. त्यामुळे 210 कोटी रुपये जिल्हा  बँकेकडे 9 महिने पडून राहिले. त्यावर 12 कोटी 88 लाख रुपये व्याज द्यावे लागले. पीक कर्ज वितरण व्याजातील तफावत याचाही बँकेला 10 कोटी रुपयांचा  फटका बसला.
ज्येष्ठ संचालक तथा माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वात सौ. रोहिणी खेवलकर-खडसे, उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील व इतर संचालकांनी बँकेच्या  आधुनिकीकरणाची अनेक कामे पूर्ण केली आहेत. त्यात सर्व शाखांचे संगणकिकरण झाले असून त्या सीबीएस प्रणालीने जोडल्या आहेत. फंड ट्रान्सफरसाठी लागणार्‍या  एनईएफटी व आरटीजीएस यासह एसएमएस सेवा सुरू झाली आहे. नाबार्डच्या सहकार्याने प्रत्येक तालुका शाखेत आर्थिक साक्षरता केंद्र (एफएलसी) सुरू झाले आहे.  मुख्य शाखेसह जिल्ह्यातील 56 शाखांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व अलार्म सिस्टीम सुरू झाली आहे. बँकेतील महत्त्वाच्या कागदपत्रांचे डिडिटलायझेशन केले आहे.  शेतकर्‍यांना रुपे कार्ड व किसान कार्डचे वाटप झाले आहे. ते एटीएमसाठी वापरता येते. याशिवाय सन्माननिय ग्राहकांसाठी आव्हीएम डेबिट कार्ड वाटप केले आहे. या  कार्डचा वापर करुन ग्राहक ऑनलाईन शॉपिंग करु शकतात. आयएमपीएस सेवेद्वारे ग्राहक कोणत्याही शाखेत फंड ट्रान्सफर करु शकतात.
आर्थिक स्थितीचा विचार करता जिल्हा बँकेत भागभांडवल 21 कोटींनी वाढले. ठेवींमध्ये 450 कोटींनी वाढ झालेली आहे. सन 2014-15 च्या तुलनेत ही वाढ 10  टक्के आहे. खेळत्या भाग भांडवलात 625 कोटींनी वाढ असून गुंतवणुकीत 75 कोटींनी वाढ आहे. बँकेतील सर्व प्रकारचा व्यवस्थापन खर्च कमी करण्यात यश आले  आहे. हा खर्च सध्या 2.11 टक्के असून तो 2.46 वरुन कमी करण्यात आला आहे.
ज्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही मात्र ते 31 मार्च 2018 अखेर संपूर्ण कर्ज फेड करतील त्यांना दंड व्याज आकारणी केली जाणार नाही.
प्रामाणिकपणे कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर रक्कम सरकारने जाहीर केली आहे. मात्र, ती फारच कमी आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्ज फेड  करणार्‍यांनाही सरसकट दीड लाखांपर्यंत कर्जमाफी मिळावी असा ठराव बँकेच्या सर्वधारण सभेत करण्यात आला आहे. अशा प्रकारे बँकेने 31 मार्च 2016 अखेर  थकित कर्ज असलेल्या शेतकर्‍यांनी कर्जफेड 31 मार्च 2017 ला पूर्ण केली आहे त्यांच्या 1 टक्के व्याज नुकसानीची भरपाई बँकेने केली आहे. त्याचा लाभ 4501  सभासदांना मिळाला आहे.