Breaking News

तंबाखूच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिरातींवर कारवाई करण्याचे आदेश

औरंगाबाद, दि. 24, सप्टेंबर - तंबाखू नियंत्रण कायदा 2003 कलम 5 अन्वये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी असतांना शहरातील ज्या टपर्‍यांवर तंबाखू व  तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती आढळून येतील त्यांच्यावर पोलीस विभाग आणि अन्न, औषध प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर  राम यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी नवल किशोर राम  यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. ए. रामटेके, समिती सदस्य सर्वश्री डॉ. प्रसाद करंदीकर,  एन. एन. बडे, सजन कारभारी शिंदे यांच्यासह आरोग्य अधिकारी (मनपा) डॉ. संध्या टाकळीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनंदा मदगे, अन्न सुरक्षा  अधिकारी श्रीमती जोत्सना जाधव व श्रीमती मेघा जाधव, पोलीस उपनिरीक्षक (ग्रामीण) व्ही.पी. जाधव इतर संबंधित उपस्थित होते. जिल्हाधिकारी नवल किशोर  राम यांनी शिक्षण विभागांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन ज्या शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखू, तत्सम पदार्थांची विक्रीची ठिकाणे  आढळुन येतील, त्याबाबतचा अहवाल सादर करुन संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करावी. तसेच तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात प्रबोधन, जनजागृती हा घटक  अधिक महत्त्वाचा ठरणारा असून विद्यार्थी, ग्रामीण भागातील नागरीक, कामगार यांच्यासह विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे  प्रबोधन करावे. अन्न व औषध प्रशासन विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यावतीने जिल्हयातील पानटपरी चालक-मालक यांचीकार्यशाळा आयोजित करावी.  अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालयांतर्गततंबाखू नियंत्रण कायदा 2003 नुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दरमहा  सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत शाळा, महाविद्यालय, रेल्वे, बस स्थानक, ग्रामीण भागात  राबविण्यात आलेल्या विविध जनजागृती उपक्रमांची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. ए. रामटेके यांनी यावेळी दिली.