Breaking News

प्रभाग क्र. 21 साठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून धनंजय गायकवाड रिंगणात

पुणे, दि. 24, सप्टेंबर - पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मधील पोटनिवडणूकीसाठी आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धनंजय सूर्यकांत गायकवाड  यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या आकस्मिक निधनाने ही जागा रिक्त झाली होती. 
शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण, पालिकेतील विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून धनंजय गायकवाड  यांनी उमेदवारी अर्ज घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय येथे दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण पक्षाची भूमिका स्पष्ट करताना म्हणाल्या,  ’ही लढाई भाजपाच्या विरोधात आहे. भाजप सरकारच्या काळात देशात वाढत चाललेल्या अराजकतेमुळे संपुर्ण लोकमानसात असंतुष्टतेची भावना निर्माण होत आहे.  लोकांचा कल पाहता सामान्य नागरिकांमध्ये ह्या भाजप सरकारच्या विरोधात आक्रोश अनेक प्रकारे व्यक्त होत आहे. सामान्य नागरिकांच्या प्रश्‍नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस  पक्ष आग्रही आहे आणि म्हणूनच आम्ही ही पोटनिवडणूक लढवत आहोत.’
दरम्यान, भाजपा रिपाई कडून या पोटनिवडणुकीसाठी कांबळे यांची मुलगी हिमाली कांबळे हिने शुक्रवारी अर्ज दाखल केला आहे.