भारत हा जगातील एकमेव विचारप्रधान देश

पुणे, दि. 22 - आचार्य गोंविददेव गिरी विचार भारती संमेलनाचे पुण्यात उद्घाटन जगात विचारप्रधान देश असेल तर भारतच आहे. वैचारिक अस्पृश्यता हा भारतीय  परंपरेचा कधीही भाग नव्हता. त्यामुळे मनुष्याच्या उन्नयनासाठी विचारांचे आदानप्रदान व्हायला हवे, असे प्रतिपादन आचार्य गोंविददेव गिरी यांनी रविवारी केले.  बिबवेवाडीतील अण्णा भाऊ साठे सभागृहात भारतीय विचार साधना आणि विश्‍व संवाद केंद्र यांच्या वतीने आयोजित पहिल्या विचार भारती साहित्य संमेलनाचे उद्घाटन  आचार्य गोंविददेव गिरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष संदीप वासलेकर, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष किशोर शशीतल, विश्‍व संवाद  केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, स्वागताध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत, गीताधर्म मंडळाचे अध्यक्ष व संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार या प्रसंगी  व्यासपीठावर उपस्थित होते. आचार्य गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते ज्येष्ठ विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचा 90 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या प्रसंगी सत्कार  करण्यात आला. यावेळी बीजभाषण करताना आचार्य गोविंददेव गिरी म्हणाले, जे लिहिले जाते, जे खपते ते सगळे साहित्य असते का याचा विचार कोणीतरी करायला  हवा. ज्या साहित्याच्या वाचनाने, परिशीलनाने मनुष्याच्या पापवृत्तींचे उपशमन होते ते उत्तम साहित्य. जे जीवनाला सद्गुणांनी सजविते ते उत्तम साहित्य. मात्र जे  वाचायला हवे ते कसे शोधावे हा प्रश्‍न निर्माण होतो.
ते म्हणाले, की साहित्याचा पुनर्विचार व्हायला हवा, हा विचार बर्‍याच दिवसांपासून मनात घोळत होता. विचारांचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, मनुष्याचे  आंतरिक उन्नयन हवे असेल तर विचार आवश्यक आहेत. मनुष्याचा विकास बुद्धीमुळे झाला आहे आणि विचार हे बुद्धीचे कार्य आहे. मानवी मनाचे खरे उन्नयन होते व  त्याला अंतिम स्थिती प्राप्त होते, ते विचारांमुळे. जगात विचारप्रधान देश असेल तर भारतच आहे. वैचारिक अस्पृश्यता हा भारतीय परंपरेचा कधीही भाग नव्हता.  भारताची परंपराच मुळात विचारांची परंपरा आहे. समाजात सगळेच विकारांवर जगणारे नाहीत. तसेच स्वातंत्र्य विचारांचे हवे विकारांचे नाही. केवळ तर्काने आपल्याला  या विश्‍वाचे गूढ उकलणार नाही, असेही ते म्हणाले. अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री. वासलेकर म्हणाले, विचारांची चर्चा करताना आपण सैद्धांतिक चर्चेवर जास्तीत  जास्त भर द्यायला हवा. आज, काल आणि उद्या या विचारांचा संगम व्हायला हवा. साहित्याला संशोधनाची जोड देण्याची गरज असून पाश्‍चात्य देशांच्या तुलनेत  आपण संशोधनात कमी पडतो. संशोधन हा आपल्या संशोधनाचा स्तंभ व्हायला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, की विज्ञान आणि वाङ्मय हे एकमेकांशी जोडलेले  असते. तत्त्वज्ञान व तंत्रज्ञान हे एकमेकांत पूर्ण मिसळलेले आहेत. पाश्‍चात्य विचार हा विश्‍लेषणावर आधारित आहे. भारतीय विचार हा संश्‍लेषणावर आधारित आहे. या  संमेलनामागची भूमिका स्पष्ट करताना स्वागताध्यक्ष प्रदीप रावत म्हणाले, इतर कुठल्याही संमेलनाशी या संमेलनाची स्पर्धा नाही. वैचारिक अस्पृश्यता संपविणे, हा या  संमेलनाचा उद्देश आहे. हे विचारकलहाला निमंत्रण आहे. चांगल्या, सकस साहित्याची निर्मिती ही सांस्कृतिक मूल्यांवर आधारित असते. कुठल्याही कलेच्या  विकासासाठी व्यक्तिस्वातंत्र्य आवश्यक असते. पारंपरिक कल्पनांचे जोखड फेकून देऊ तेव्हाच सकस साहित्याची निर्मिती होते. संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मुकुंद  दातार म्हणाले, की हे संमेलन विज्ञान व अध्यात्माचा संगम करण्यासाठी आहे. हे संमेलन जीवनवादी साहित्याची चळवळ पुन्हा सुरू करण्यासाठी आहे . कोणत्याही  विचारधारेचा प्रसार करण्यासाठी किंवा कोणत्याही विचारधारेला विरोध करण्यासाठी नाही. हे संमेलन नैतिकतेच्या पायावर जीवनवादी साहित्य उभे राहावे यासाठी  आहे. साहित्याला योग्य दिशा देण्याची गरज - मेहेंदळे संमेलनाच्या पहिल्या सत्रात ’व्यक्ती, समाज आणि साहित्य’ या विषयावर परिसंवाद झाला. ज्येष्ठ निवेदक व  लेखक डॉ. विश्‍वास मेहेंदळे हे या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रभाकर पुजारी, डॉ. जयंत कुलकर्णी, डॉ. सुप्रिया अत्रे आणि विनय पत्राळे हे या परिसंवादातील  वक्ते होते. यावेळी बोलताना डॉ. मेहेंदळे म्हणाले, की आज दूरचित्रवाणीवरील मालिकांच्या रूपाने अत्यंत चुकीचे चित्र उभे करण्यात येत असून समाजाला योग्य दिशेने  नेण्याची जबाबदारी साहित्यिक व लेखकांची आहे. त्यामुळे साहित्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. तसेच दुसर्‍या सत्रात प्रसिद्घ वक्ते डॉ. संजय उपाध्ये यांचा  ’मातृभाषेतून मनःशांती’ हा कार्यक्रमही झाला. यावेळी अनेक मान्यवर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.