पंजाब नॅशनल बॅँकेतून 10 लाखांची चोरी; महिनाभरात दुसरी घटना
धुळे - येथील पंजाब नॅशनल बॅँकेच्या मुख्य शाखेतून 10 लाख रूपयांची चोरी झाल्याची घटना घडली. महिनाभरात दुस-यांदा घडलेल्या लुटीच्या अशा घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.बॅँकेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी कॅशिअरकडे आर्थिक व्यवहारांसाठी सुमारे 10 लाख रुपयांची रक्कम ठेवलेली होती. ग्राहकांची गर्दी झालेली होती. याच गर्दीचा फायदा उचलत कॅ शिअर मधुकर वाघ यांच्या कक्षाच्या आत जाऊन तेथे व्यवहारासाठी ठेवलेली 10 लाखांची रक्कम उचलून चोरट्याने बॅँकेतून पोबारा केला.
कॅशिअर वाघ व शिपाई आनंद सैंदाणे हे दोघे तेव्हा तेथेच होते. मात्र जेव्हा ग्राहकास रक्कम देण्याची वेळ आली तेव्हा पैसे चोरी झाल्याचे कॅशिअर वाघ यांच्या लक्षात आले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. याबाबत लगेच आझादनगर पोलिसांना माहिती देण्यात आली.उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव तत्काळ सहका-यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी तपासासाठी आवश्यक पाहणी केली. तसेच त्यासाठी बॅँकेचे व्यवस्थापक उदयकुमार सिन्हा, कॅशिअर मधुकर वाघ, शिपाई आनंद सैंदाणे सुरक्षारक्षक दिलीप सोनवणे यांना विचारपूस करून माहिती घेतली.