Breaking News

मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच म्हैसाळ योजनेचे वीज कनेक्शन तोडले

सांगली, दि. 22 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौ-यास एक दिवस होण्याआधीच सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी तालुक्यांना पाणीपुरवठा करणारी म्हैसाळ  उपसा जलसिंचन योजनेची वीज तोडण्यात आली. ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्रतेने गरज असताना या योजनेचे आवर्तन बंद करण्यात आल्याने दुष्काळी भागातून  तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सायंकाळी सांगली जिल्हा दौ-यावर होते. त्यानंतर लगेचच शनिवारी सायंकाळच्या सुमारास म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेची वीज  तोडण्यात आली. वीज खंडीत करण्यात आल्याने देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी करून कौतुक केलेल्या सुखकर्ता बंधार्यातून होणारा पाण्याचा विसर्गही थांबणार आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्यानंतर 24 तासातच या योजनेचे आवर्तन बंद करण्यात आल्याने केवळ दौ-यापर्यंतच वीज तोडणी लांबवली होती काय, असा संतप्त प्रश्‍नही  मिरज तालुका पूर्व भागातील शेतकर्यांतून उपस्थित होत आहे.
म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेची एप्रिल 2017 अखेरची 18.5 कोटी रूपये थकबाकी होती. त्यानंतर मे महिन्यात 20 तारखेपर्यंतचे तीन कोटी असे एकूण 21.5  कोटी रूपये थकबाकी आहे. यातील नऊ कोटी 60 लाख रूपये तात्काळ भरणे आवश्यक आहे. या रकमेचा भरणा करण्यासाठी वीज महावितरण कंपनीने पाटबंधारे  विभागाला वारंवार सूचनाही केली आहे. त्यानुसार थकित बिल भरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाच्यावतीने लाभधारक शेतक-यांना करण्यात आले होते. मात्र या  आवाहनास पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही व संबंधित सहकारी साखर कारखानदारांनीही पैसे भरण्यासाठी सहकार्य केले नाही.
त्यामुळे पाटबंधारे विभागाकडील अधिकारी विवंचनेत होते. पाटबंधारे विभागाकडून रकमेबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर वीज महावितरण कंपनीने या  योजनेची वीज तोडली. अवघ्या तीन दिवसापूर्वीच म्हणजे दि. 17 मे रोजीच या योजनेचे आवर्तन पूर्ण उन्हाळा सुरू राहणार, या आनंदात शेतकरी होते. मात्र ही  आशा फोल ठरली आहे. परिणामी ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मिरज तालुका पूर्व भागासह कायम दुष्काळी जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेला  वणवण फिरावे लागणार आहे. या पाणीटंचाईमुळे जनावरांच्या हिरव्या चा-याचा प्रश्‍न गंभीर होणार असून द्राक्ष बागायतदार शेतक-यांना आर्थिक ङ्गटका बसण्याची  भीती व्यक्त होत आहे.