संर्पदंश प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर कावाई करावी

। मावळा प्रतिष्ठानची सिव्हील सर्जनकडे निवेदनाव्दारे मागणी 

अहमदनगर, दि. 24 - सर्पदंश झालेल्या मुलांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन न घेता, रुग्णाच्या मृत्यूस कारणीभुत ठरणार्या संबंधित डॉक्टर व कर्मचार्यांवर कारवाई व्हावी तसेच त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मावळा प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन सिव्हिल सर्जन डॉ.एस.एम. सोनवणे यांना देण्यात आले. यावेळी अध्यक्ष निलेश म्हसे, महेश शेळके, दानिश शेख, अक्षय उमाप, अमोल मोरे, आदीनाथ भांगरे, भारतरत्न कोंडार, अंकुश भोरे, गणेश टोने, नितीन साबळे, नवनाथ भांगरे, शंकर लांघी, हेमंत घोडके आदि उपस्थित होते. सिव्हिल सर्जन सोनवणे यांनी अतिदक्षता विभागाची वेगळी व्यवस्था करुन बेड संख्या वाढविण्याचे व या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले.
मुळचे अकोले तालुक्यातील हरिश्‍चंद्र गड येथील राहणारे तुकाराम मधे सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी येथे शेतमजुरी करत आहे. त्यांच्या तीन मुलांना मंगळवारी रात्री तीन मुलांना साप चावला असता. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आनण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी जागा नसल्याचे कारण दाखवत, त्यांच्यावर उपचार न करता खाजगी रुग्णालयाचा रस्ता दाखविला. तसेच प्राथमिक उपचार करण्यास देखील असमर्थता दाखविली. या दिरंगाईमुळे त्यांची 9 वर्षाची मुलगी उज्वला मधे (वय 9 वर्षे) हीला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेने पुन्हा जिल्हा शासकिय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पहावयास मिळाला आहे. तसेच सर्पदंश झालेले प्रमिला मधे (वय 11 वर्षे), राजेंद्र मधे (वय 7 वर्षे) यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले असता शहरातील नामांकित चॅरीटेबल हॉस्पिटलांनी देखील त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला. या प्रकरणाने येथील डॉक्टर व कर्मचार्यांचे खासगी हॉस्पिटलशी असणारे लागेबाधे स्पष्ट होत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.